लग्नासाठी निघालेल्या पती-पत्नीसोबत घडली धक्कादायक घटना
Ahmednagar News: साडे चार तोळ्यांचे दागिने लंपास.
अहमदनगर: दुचाकीवरून लग्नासाठी निघालेल्या पती पत्नीला दोघांनी रस्त्यात अडविले. त्यांच्याकडील साडे चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतल्याची घटना रविवारी (दि. १७) दुपारी तीनच्या सुमारास नगर-कल्याण रस्त्यावर निमगाव वाघा (ता. नगर) शिवारात घडली.
याप्रकरणी शारदा केदार (रा. बालिकाश्रम रस्ता, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन चोरट्यांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी फिर्यादी व त्यांचे पती त्यांच्या दुचाकीवरून लग्नासाठी कल्याण रस्त्यावरून जात असताना त्यांना दुचाकीवरील दोघांनी आशिर्वाद ते निमगाव वाघाच्या दरम्यान अडविले. फिर्यादीच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, अर्धा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व दीड तोळ्याचा सोन्याचा राणीहार असे साडे चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने हिसकावले. घटनास्थळावरून दोघे चोरटे पसार झाले. फिर्यादी व त्यांच्या पतीने तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.
दुचाकीला लाथ मारून महिलेच्या गळ्यातील ७० हजाराचे गंठण हिसकावले. रविवारी नगर तालुक्यातील निंबळक ते निमगाव घाणा रस्त्यावर निंबळक शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी दत्तात्रय मुठे (रा. निंबळक) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुठे हे त्यांची सून व नातीला घेऊन दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीला लाथ मारल्याने सून व नात दुचाकीवरून खाली कोसळले. सुनेच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी ओरबाडले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान दोन्ही घटनेतील चोरटे एकच असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Web Title: The incident happened with the husband and wife who were going to get married
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App