Fertilizer Price Increase : शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च एकीकडे वाढत असताना दुसरीकडे रासायनिक खतांच्या किंमती वाढत आहेत. अतिरिक्त उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी मोठया प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. खतांचा वापर जास्त होत असल्याने रासायनिक खतांच्या किंमतीत देखील आता वाढ होताना दिसत आहे. विविध संकटामुळे शेतकरी चिंतेत असताना आता पुन्हा खतांच्या किंमतीत वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता आणखी भुर्दंड सोसावा लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ होत असल्याने शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खताच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पोटॅश खतांच्या एका पोत्यामागे तब्बल 700 रुपयापर्यंत वाढ झाली आहे. पोटॅशच्या किंमती वाढल्याने इतर खतांच्या किंमतीत 150 ते 250 रुपयापर्यंत वाढ होत आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार असून त्याची झळ पुन्हा शेतकऱ्यांना बसणार आहे. यातून कोरोनामुळे आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट होऊ शकते. मागील तीन महिन्यांपासून रासायनिक खतांच्या किंमतीत सततची वाढ होत असल्याचे दिसत आहे.
खरीप हंगामात 10:26:26 खताची 1 हजार 175 रुपये देऊन मिळणारी गोणी आता 1 हजार 500 रुपयांना मिळणार आहे. त्याचबरोबर पोटॅशची एक गोणी खरीप हंगामात 1हजार 40 रुपयांना मिळत होती. ती मात्र आता 1 हजार 700 रुपयांना मिळणार आहे. अशा प्रकारचे खतांच्या किंमतीत अमाप वाढ झाली आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना बऱ्यापैकी खते उपलब्ध झाली होती. रब्बी हंगामात खतांचे दर स्थिरावतील अशी देखील अपेक्षा होती. सुयोग्य पावसामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र याठिकाणी पेरण्या चांगल्या झाल्या होत्या. मात्र आता गहू, ज्वारी, मका या पिकांना खतांची गरज भासत आहे. तर दुसरीकडे फळबागा, भाजीपाला आणि उसाच्या पिकालाही मोठ्या प्रमाणावर खते लागतात. अशा परिस्थितीत खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. विविध संकटामुळे आधीच शेतकऱ्यांचे उत्पादन घटताना दिसते. त्यात खतांच्या किंमती गगणाला भिडत आहेत. तीन महिन्यांपासून खतांचा पुरवठा देखील अपुरा आहे. आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाचे दर वाढल्याने देशातील सर्वच मिश्र खतांच्या किंमतीत आता वाढ झाली आहे.
Web Title : Increase in farmer anxiety; Fertilizer prices changed