कनाशीत प्रभाग समन्वयक लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
Breaking News | Nashik Crime: महिलेच्या कामाचा तीन महिन्यांचा मोबदला बँकेत जमा केल्याने त्यात चार हजार ८०० रुपयांची लाच (Bribe) मागून ती स्वीकारताना प्रभाग समन्वयक जाळ्यात अडकला आहे.
नाशिक : तक्रारदार महिलेच्या कामाचा तीन महिन्यांचा मोबदला बँकेत जमा केल्याने त्यात चार हजार ८०० रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना ग्रामीण जीवन्नोती अभियानाच्या प्रभाग समन्वयकाला रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत अभोणा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
देवीदास सयाजी चव्हाण (प्रभाग समन्वयक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, कळवण) असे लाचखोराचे नाव आहे.
‘लाचलुचपत’च्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वैशाली पाटील, हवालदार शरद हेंबाडे, महिला पोलिस अंमलदार शीतल सूर्यवंशी यांनी कामगिरी बजावली.
३१ वर्षीय तक्रारदार महिलेच्या तक्रारीनुसार, त्यांनी केलेल्या कामाचे तीन महिन्यांचे १६ हजार ८०० रुपये तक्रारदार यांच्या बँक खात्यावर जमा झाले. त्या मोबदल्यात लाचखोराने स्वतःसाठी व त्याच्या वरिष्ठासाठी ६ तारखेला चार हजार ८०० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
याप्रकरणी तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने पडताळणीनंतर सोमवारी (ता. ११) कनाशी ग्रामपंचायतीच्या भक्त निवास, पाच पांडव मंदिर हॉल येथे लाचेची रक्कम स्वीकारताना लाचखोराला रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Kanashi ward coordinator arrested red-handed while accepting bribe
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study