संगमनेर: रुग्णालयात नेण्याचा बहाणा करत मुलीचे अपहरण
Breaking News | Sangamner: १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला कर्नाटक राज्यातील हुबळी येथे घेऊन जाणाऱ्या महिलेला न्यायाधीशांनी सहा महिने कारावास, १५ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा.
संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला कर्नाटक राज्यातील हुबळी येथे घेऊन जाणाऱ्या महिलेला न्यायाधीशांनी सहा महिने कारावास, १५ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे. या महिलेच्या पतीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बुधवारी (दि.१४) येथील अतिरिक्त सह जिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी हा निकाल दिला.
शनाया ऊर्फ शिवानी सूरज डुलगच (रा. संगमनेर) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती सूरज प्रेमसिंग डुलगच (रा. संगमनेर) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सरकारी वकील म्हणून बी. जी. कोल्हे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. यात अल्पवयीन मुलीचा जबाब महत्त्वपूर्ण ठरला. पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस कॉन्स्टेबल दीपाली दवंगे या काम पाहत असताना त्यांना पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रवीण डावरे, महिला पोलिस कॉन्स्टेबल स्वाती नाईकवाडी, नयना पंडित, प्रतिमा थोरात यांनी सहकार्य केले.
याबाबत माहिती अशी की, ४ ऑगस्ट २०१६ ला दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्याच्या एका गावातून १४ वर्षे ४ महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. शनाया ऊर्फ शिवानी डुलगच हिने अल्पवयीन मुलीला रुग्णालयात जायचे आहे. असे कारण सांगून तिला घेऊन गेली होती. मुलीला रिक्षात बसवून लोणी येथे नेले, त्यानंतर संगमनेर आणि तेथून बसने पुण्याला नेण्यात आले. बसमधून स्वारगेट येथे उतरल्यानंतर तेथून रिक्षातून मुलीला भाड्याने घेतलेल्या खोलीत नेले. तेथे शिवानी डुलगच आणि अल्पवयीन मलगी ५-६ दिवस थांबले. त्यावेळी शिवानी ही इंग्रजी आणि कानडी भाषेतून कुणाशी तरी फोनवर बोलायची. ती अल्पवयीन मुलीला कर्नाटक राज्यातील हुबळी येथे घेऊन गेली. त्यावेळी मुलीने तिच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तिला मारहाण करण्यात आली होती.
‘तू जर पळून जाण्याचा प्रयत्न केला तर मी तुला येथेच सोडून जाईल,’ असा दम शिवानी हिने दिल्याने मुलगी घाबरून तिच्यासोबत राहत होती. काही दिवसांनी मुलीला मुंबईला नेण्यात आले. तेथे एक दिवस थांबून पुन्हा तिला रेल्वेने हुबळी येथे नेण्यात आले. तेथेच त्या थांबत. पैसे संपल्यानंतर शिवानी हिने रेल्वे स्टेशनवर भेटलेल्या दोन मुलांना पैशांची मागणी केली. त्या मुलांनी सिकंदराबाद येथे जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढून दिले. दरम्यान प्रवासात त्यांना पोलिसांनी पकडले. त्यानंतर दोघींनाही पोलिस ठाण्यात नेण्यात आले.
Web Title: Kidnapping of a girl on the pretext of taking her to a hospital
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study