Kolhapur Crime : पैसे न देता भेळ खाणे आणि भेळीच्या गाडीजवळ थुंकण्याच्या वादातून कोल्हापुरातील एका प्रसिद्ध भेळचे मालक रवींद्र शिंदे यांच्यावर तीन जणांनी प्राणघातक हल्ला केला आहे. यानंतर हल्लेखोरांना तेथील नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. प्रथमेश गायकवाड, आभिषेक सरदार आणि गणेश यलगट्टी या तिघांचा यात समावेश आहे.
पाचगाव येथील काही तरूण आठवड्याभरापूर्वी खासबाग मैदानाजवळच्या खाऊ गल्लीत गेले होते. तेथे त्यांनी विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घेतले. पदार्थाचे पैसे न देताच ते निघून जाऊ लागले. त्यावेळी या तिघांसोबत खाऊ गल्लीतील विक्रेत्यांशी वाद झाला. त्यातून एका तरुणाला या व्यवसायिकांनी मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी मात्र त्याला समज देऊन सोडले.
मात्र या घटनेचा बदला घेण्यासाठी मंगळवारी दुपारच्या सुमारास तीन तरूण शस्त्र घेऊन खासबाग नजीक असलेल्या महिला बँकेच्या गाळ्यातील एका दुकानाजवळ गेले. तेथून त्यांनी थेट गल्ल्यात हात घालून पैसे काढले. तसेच रवींद्र शिंदे यांच्यावर हल्ला केला. दरम्यान शिंदे हे सावध असल्याने त्यांनी हा हल्ला परतवून लावला. याचदरम्यान खाऊ गल्लीतील इतर विक्रेते व्यापारी त्यांच्या मदतीला धावून आले. आणि त्यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. या हल्लेखोरांपैकी एक जण पळून गेल्यानंतर दोघांना व्यापाऱ्यांनी चांगलाच चोप दिला.
काल सायंकाळी शिंदे यांची रीतसर फिर्याद नोंदवून पोलिसांनी गुन्हा दाखल करत अभिषेक सरदार, गणेश यलगट्टी या दोघांना अटक केली, तर तिसरा संशयित आरोपी प्रथमेश गायकवाड याचा शोध सुरू केला आहे.
Web Title : Kolhapur Crime : Assault on Bhel vendor over free food dispute