अहमदनगर: पाच लाखांच्या खंडणीसाठी वकील दाम्पत्याची हत्या, चार आरोपी गजाआड
Breaking News | Ahmednagar: पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी वकील दाम्पत्याचा अपहरण करीत निर्घृण हत्या केल्याची घटना ४ आरोपी २४ तासांत गजाआड.
राहुरी | Rahuri: पाच लाख रुपयांच्या खंडणीसाठी वकील दाम्पत्याचा अपहरण करीत निर्घृण हत्या केल्याची घटना राहुरी परिसरात घडली. पैशासाठी ५ ते ६ तास छळ केल्यानंतर आरोपींनी दोघांच्या डोक्यामध्ये प्लास्टिक पिशव्या टाकून गुदमरून मारून टाकले. मृतदेहांना मोठ मोठे दगड बांधत उंबरे (ता. राहुरी) येथील विहिरीत टाकून दिले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अॅड. राजाराम जयंत आढाव (वय ५२) व अॅड. मनीषा राजाराम आढाव (वय ४२, रा. मानोरी, ता. राहुरी) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. ते अनेक वर्षांपासून राहुरी न्यायालयात वकिली व्यवसाय करीत होते. सर्वसामान्यांना नेहमीच सहकार्य करीत असल्याने ते सर्वांच्या परिचित होते. दोघेही २५ जानेवारी रोजी न्यायालयात हजर होते. दुपारनंतर त्यांचा संपर्क होत नसल्याने नातलग लता राजेश शिंदे (रा. बाजारपेठ, पानसरे गल्ली, संगमनेर) यांनी दोघे बेपत्ता असल्याची तक्रार दिली.
वकील दाम्पत्य गायब झाल्याची माहिती राहुरी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूर विभागाच्या पोलिस अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक बसवराज शिवपुंजे यांनी घटनेचे गांभीर्य घेत, तत्काळ स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना घटनेचा छडा लावण्याचा आदेश दिला. आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पुढाकार घेत बेपत्ता वकिलांकडे असलेल्या वकीलपत्रांची माहिती घेतली. सीसीटीव्ही तपासणीत मानोरी हद्दीत व न्यायालय हद्दीत फिरणाऱ्या एका संशयित चारचाकी गाडीची चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये सदरची गाडी ही सराईत गुन्हेगार किरण दुशिंग याची असल्याची समजले. प्रशासनाने तत्काळ किरण दुशिंग यास ताब्यात घेत विचारपूस केली. परंतु, तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने घटनेचा उलगडा केला.
किरण ऊर्फ दत्तात्रय दुशिंग (वय ३२, रा. उंबरे ता. राहुरी) याने साथीदार भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे (वय २३, रा. येवले आखाडा ता. राहुरी), शुभम संजीत महाडिक (वय २५, रा. गणपतवाडी, मानोरी ता. राहुरी), हर्षल दत्तात्रय ढोकणे व बबन सुनील मोरे (दोघे रा. उंबरे ता. राहुरी) यांच्यासह ५ लाख रूपयांच्या खंडणीसाठी वकील दाम्पत्याला संपविल्याची माहिती दिली.
माहिती समजताच पोलिस प्रशासनाने उंबरे (ता. राहुरी) येथील स्मशानभूमी परिसरात दाखल होत शुक्रारी (दि. २६) जानेवारी रोजी रात्री १० वाजता मोठमोठ्या दगडाने बांधून टाकून दिलेल्या अवस्थेत बाहेर काढले. घटना घडल्याच्या २४ तासांच्या आतच पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. आरोपी बबन मोरे हा फरार आहे.
पथकामध्ये पोलिस निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हवालदार मनोज गोसावी, रविंद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, अमृत आढाव, सागर ससाणे, संदिप पवार, दत्तात्रय गव्हाणे, सचिन अडबल, भिमराज खसे, प्रमोद जाधव, रणजित जाधव, संतोष खैरे, फुरकान शेख, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भाऊसाहेब काळे, संभाजी कोतकर, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे यांनी सदरची कारवाई करीत २४ तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपी बबन मोरे रा. उंबरे ता. राहुरी हा फरार आहे.
असा घडला घटनाक्रम
आरोपींनी २५ जानेवारीला दुपारी २ वाजता आढाव दाम्पत्याला कोर्ट केसचे काम असल्याचे सांगत बोलावून घेतले. त्यानंतर दोघांचे हातपाय बांधत किरण दुशिंग याने त्यांना आपल्या गाडीतून मानोरी (ता. राहुरी) येथील घरी नेले. तेथे दोघांचा छळ करीत खंडणीची मागणी केली. पैसे देत नसल्याने सायंकाळी निर्जनस्थळी नेले. दोघांच्या डोक्यामध्ये प्लास्टीक पिशव्या टाकत श्वास गुदमरून मारुन टाकले. रात्रीच्या वेळी दोघांच्या मृतदेहाला मोठे मोठे दगड बांधून उंबरे (ता. राहुरी) येथील स्मशानभूमीच्या जागेत असलेल्या विहिरीत टाकून दिले. २६ जानेवारी पहाटे वकील दाम्पत्याची चारचाकी गाडी न्यायालयात आवारात लावली. पोलिस प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरा व मोबाईल तांत्रिक पद्धतीचा वापर करत आरोपीचा छडा लावला.
Web Title: Lawyer couple killed for extortion of five lakhs
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study