अहमदनगर: फोनवर मोठ्याने बोलण्याच्या रागातून एकाचा खून
Ahmednagar News | Jamkhed: मोबाईलवर इतर व्यक्तीला मोठ्याने शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून तीन जणांनी एकास गजाने व बांबूने केलेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू, दोघेजण अटक.
जामखेड : मोबाईलवर इतर व्यक्तीला मोठ्याने शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून तीन जणांनी एकास गजाने व बांबूने केलेल्या जबर मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी जामखेड तालुक्यातील बोलें ते जवळा रस्त्यावरील पठाडे वस्ती जवळ घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. शिवाजी रामदास चव्हाण असे मृत इसमाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील बोर्ले येथील शिवाजी रामदास चव्हाण हा आपल्या नातेवाईका समवेत दि.१३ डिसेंबर २०२३ रोजी बोलें ते जवळा रोडवरील एका हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी सायंकाळी ७:४५ वा शिवाजी चव्हाण हॉटेलच्या बाहेर कोणाशीतरी फोनवर मोठ्याने बोलत शिवीगाळ करत होता. त्या ठिकाणी सुरेश बाबुराव पठाडे हा आला व शिविगाळ का करतो, या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन जोराचे भांडण झाले. या भांडणाची माहिती शिवाजी चव्हाण याचे वडील रामदास चव्हाण यांना समजताच ते आपल्या पत्नीसह तातडीने त्या ठिकाणी मोटारसायकलवर पोहचले. यावेळी सुरेश पठाडे हा त्याच्या हातातील गजाने व आदित्य (उर्फ) गोपाल सुरेश पठाडे व एक अनोळखी इसम असे तिघेजण शिवाजी यास मारहाण करत होते. यावेळी त्या ठिकाणी असलेले शिवाजीचे नातेवाईक लक्ष्मण सुखदेव मते (रा. मतेवाडी), फिर्यादीचा पुतण्या निलेश अभिमान चव्हाण तसेच शिवाजीचे आई वडील हे देखील भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आरोपी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी सुरेश पठाडेसह इतर आरोपींनी शिवाजीला गजाने व लाकडाने मारहाण व शिवीगाळ करून घटनास्थळाहुन निघुन गेले. या मारहाणीत शिवाजी रामदास चव्हाण हा गंभीर जखमी झाला. शिवाजीच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होत होता. यानंतर घटनेची माहिती समजताच फिर्यादी यांच्या भावाची मुले दिलीप चव्हाण व अंकुश चव्हाण हे घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने खाजगी वाहनाने जखमी शिवाजी यास जामखेड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र दि.१४ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे ४ वाजता शिवाजी चव्हाण याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत शिवाजी चव्हाण याच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मोबाईल इतर व्यक्तीला शिवाजीने शिवीगाळ केली म्हणून दुसऱ्याच व्यक्तीच्या मारहाणीत शिवाजीला नाहक आपले प्राण गमवावे लागले. मोबाईलवर फोनच्या बोलण्यावरून हा खुन झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच कर्जत उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत वाखारे, जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तातडीने पो.हे.कॉ संजय लोखंडे, पो.ना. अजय साठे, पो.ना अविनाश ढेरे, पोकॉ. नवनाथ शेकडे, प्रविण पालवे, प्रकाश जाधव, यांनी तपास करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करीत आहेत.
Web Title: Man was killed out of anger for talking loudly on the phone
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App