मंत्री विखे पाटील यांना कोणते खाते मिळणार?
Minister Radhakrishan Vikhe Patil: मंत्रिमंडळात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी.
नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यांना पुन्हा महसूल की दुसरे एखादे कोणते खाते मिळणार याची उत्सुकता जिल्ह्यातील जनतेला लागली आहे.
चौदाव्या विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल मंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली होती. महायुतीला जिल्ह्यात दहा जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात वर्णी लागावी
यासाठी विखे पाटील यांच्यासह भाजपचे आमदार मोनिका राजळे, आमदार शिवाजी कर्डिले तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप व आमदार आशुतोष काळे यांची नावे चर्चेत होती. मात्र, फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे पाटील यांचीच वर्णी लागली आहे.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. मात्र, अद्याप मंत्रिपदावर विराजमान झालेल्या मंत्र्यांना खाते वाटप झालेले नाही. एक दोन दिवसांत खातेवाटप होणार आहे. मंत्रिपदी वर्णी लागलेल्या मंत्र्यांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील व गणेश नाईक हे ज्येष्ठ मंत्री आहेत. हे दोन्ही नेते १९९५ मधील भाजप शिवसेना या युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. सध्याच्या फडणवीस सरकारमध्ये विखे पाटील हे ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे विखे पाटील यांना पुन्हा महसूल खाते देतात की दुसरे एखादे महत्त्वाचे खाते देतात. याकडे जिल्हाभरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
पालकमंत्री जिल्ह्यातील की जिल्हाबाहेरील जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे राजकीय, विकासात्मक आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे पालकमंत्रिपदासाठी देखील रस्सीखेच होत असते. गेले सव्वादोन वर्षे राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री होते. सध्या जिल्ह्यातील ते एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. पालकमंत्रीपदाची नियुक्ती मुख्यमंत्री करतात. त्यामुळे पालकमंत्री हे जिल्ह्यातील मंत्री असतील की बाहेरील जिल्ह्याचे असतील याची उत्सुकता देखील ताणली गेली आहे. यापूर्वी दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील व हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे.
Web Title: Which account will Minister Vikhe Patil get
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study