आमच्याकडेच पाण्याची तूट असताना जायकवाडीला पाणी कसं द्यायचं, नेत्यांमध्ये उडणार खळबळ
Ahmednagar News: उत्तरेतील जायकवाडी पाणीप्रश्नावरून एकमेकांसोबत भांडणाऱ्या नेत्यांमध्ये निश्चितच खळबळ उडणार. (Jayakwadi water )
नेवासा: समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार नगर-नाशिक जिल्ह्यातील धरण समूहातील पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाने काढल्यानंतर नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून 3 टीएमसी आणि मुळा धरणातून 2 टीएमसी असे एकूण पाच टीएमसी पाणी सध्या जायकवाडीसाठी सोडले जाणार आहे.
या अनुषंगाने पाटबंधारे विभागाकडून कार्यवाही सुरू केल्याने नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. यात राजकीय नेते आता एकमेकांवर आरोप करतानाच नेवाशाचे शंकरराव गडाख यांनी आज घोडेगाव इथे रास्ता रोको आंदोलन करत नवी मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावणार आहेत.
त्यांच्या या मागणीने उत्तरेतील जायकवाडी पाणीप्रश्नावरून एकमेकांसोबत भांडणाऱ्या नेत्यांमध्ये निश्चितच खळबळ उडणार असून, उत्तरेतील दिग्गज बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, काळे, कोल्हे, मुरकुटे यांच्या काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार नाही.
निळवंडे धरणाचे डावे, उजवे कालवे अद्याप पूर्ण नाही. पाणी साठवून ठेवण्यापेक्षा ते पाणी समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार जायकवाडीत सोडावे, अशी जाहीर भूमिका आमदार शंकरराव गडाख यांनी आज (2 नोव्हेंबर) गुरुवारी सकाळी घोडेगाव येथील रास्ता रोको आंदोलनाच्या वेळी बोलताना व्यक्त केली आहे.
या वेळी बोलताना गडाख यांनी समन्यायी पाणीवाटप धोरणानुसार नगर-नाशिकमधील मुळा, गंगापूर धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्याचा शासनाचा निर्णय झाला. तो मुळांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. विशेषत: नेवासा तालुक्यातील जिरायत बागायत शेती उजाड होईल. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कर्ज काढून पिकं घेतली, त्यास एक लोकेशन जरी मिळाले नाही तरी पिकं हातची जातील. आमच्याकडेच पाण्याची तूट असताना जायकवाडीला पाणी कसं द्यायचं. त्यापेक्षा निळवंडेत पाणी आहे. तांत्रिक कारणांमुळे डावा, उजवा कालवा काम बाकी असल्याची माहिती आहे. त्यामुळे तेथील पाणी पडून राहण्यापेक्षा जायकवाडीत सोडावे, अशी आग्रही भूमिका मांडली.
आमदार गडाखांच्या या मागणीने उत्तरेतील सर्वच दिग्गज नेत्यांमध्ये निश्चितच खळबळ उडणार आहे. त्यामुळेच आपल्या भाषणामध्ये आमदार गडाखांनी, उत्तरेतील नेते असे होऊ देणार नाहीत, असे मत व्यक्त करतानाच पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे विरोध करतील, असे गडाख म्हणाले. त्यांनी तसे करू नये, मात्र तसे केल्यास आम्हीही शांत बसणार नसल्याचा इशारा गडाख यांनी या वेळी दिला आहे.
समन्यायी पाणीवाटपाविरोधात आपला लढा यापूर्वी चालू होता आजही कोर्टात चालू आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चालूच राहणार, मी तालुक्यातील शेतकऱ्यांबरोबर आहे. कायम राहील, असेही गडाख यांनी ठणकावून सांगितले आहे.
समन्यायी पाणीवाटप कायदा संपूर्ण महाराष्ट्रात झाला. सोलापुरात धरणं कोरडी ठाक पडली. पुण्यातील धरणं काठोकाठ भरूनही पुण्याच्या धरणातील पाणी सोडण्याची हिम्मत अधिकाऱ्यांत नाही. मात्र, नगर-नाशिकचे पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्यासाठी तत्परता हेच अधिकारी दाखवतात, असे या वेळी सांगितले गेले.
Web Title: among the leaders who are fighting with each other over the Jayakwadi water issue
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App