Nagpur Accident : नागपूर जिल्ह्यातील गुमगाव याठिकाणी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. काही कामानिमित्त दुचाकीने प्रवास करीत असताना अपघात होऊन एका नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. लग्न होऊन एक महिनाही पूर्ण झाला नव्हता. दोघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात एकच हळहळ व्यक्ती केली जातेय. या प्रकरणी बुटीबोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
हिमांशू देवानंद राऊत (22) आणि निकिता राऊत (21) असं मृत पावलेल्या नवविवाहित दाम्पत्याचं नाव आहे. नागपुरजवळील गुमगाव येथे ते वास्तव्यास होते. घटनेच्या दिवशी हिंमाशू आपल्या पत्नीसह बोरखेडी नजीकच्या तारसी येथील आपल्या आत्याच्या मुलीची भेट घेण्यासाठी निघाला होता. याच दरम्यान झालेल्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत दोघांचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुईखैरी शहरातील हैद्राबाद-नागपूर मार्गावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तेथून एकतर्फा वाहतूक सुरू होती. हिमांशूने पुढे चालणाऱ्या चारचाकी वाहनास ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला. आणि अचानकपणे विरोधी दिशेनं येणारा ट्रेलर दिसल्याने हिमांशूचं दुचाकीवरील नियंत्रण बिघडलं आणि दुचाकी ट्रेलवर आदळली. याच दरम्यान दोघंही गंभीर जखमी झाले. यानंतर रुग्णालयात नेले असता अगोदर हिमांश व नंतर निकिताचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Web Title : Newlywed couple dies in overtaking accident in Nagpur