Nashik Crime : डॉ. सुवर्णा वाजे मृत्यू प्रकरणाचं गूढ उकलण्यात अखेर पोलीस यंत्रणेला यश आलं आहे. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला? यावर अनेक दिवसापासून प्रश्नचिन्ह उपस्थित होते. मात्र आता पोलिसांनी या प्रकरणाचा अखेर छडा लावला आहे. सुरुवातीस सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे यांनी पत्नी बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र १० दिवसानंतर तपासाला वेगळंच वळण प्राप्त झालं. आणि पती संदीप वाजेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
संदीप वाजे यांनी आपल्या पत्नीची सुपारी देऊन तिची हत्या करून आणली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हत्येप्रकरणात सामिल असलेल्यांच्या देखील मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. कौटुंबिक वादविवादातून ही हत्या झाली असल्याचं सांगितलं जातं आहे.
महापालिकेच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉ. सुवर्णा वाजे यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे जवळ एका गाडीत जळालेल्या अवस्थेत आढळला होता. हाती लागलेला मृतदेह आणि डॉ. सुवर्णा वाजे यांचा डीएनए एकच असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली. त्यामुळे डॉ. सुवर्ण वाजे मृत्यू प्रकरणाचा तपास वेगाने सुरू झाला.
डॉ. सुवर्णा वाजे यांच्या पतीने आपली पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. यानंतर डॉ. सुवर्णा वाजे या गाडीसह जळालेल्या अवस्थेत मिळाल्या होत्या. मात्र तो मृतदेह सुवर्णा वाजे यांचा आहे की इतर कोणाचा याबाबत कसलीही माहिती नव्हती. मात्र आता डीएनए तपासातून ती माहिती समोर आल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. नाशिक पोलिसांच्या तपासानुसार, डीएनए एकच असल्याने डॉ. सुवर्णा वाजे यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. डॉ. वाजे यांच्या हाडाचा डीएनए अहवाल नाशिक ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाला. डॉ. सुवर्णा वाजे यांना शहराबाहेर नेऊन जाळण्यात आल्याचा पोलिसांना अंदाज होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अखेर या प्रकरणी सुपारी देणाऱ्या पतीला अटक केली आहे.
Web Title : Nashik crime: Husband had given orders to kill wife