जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास आक्षेप, तातडीने सुनावणी घेण्यास नकार
Jayakwadi dam: उच्च न्यायालयात याचिका, खंडपीठाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देताना याचिकेची सुनावणी पुढील आठवड्यात घेण्याचे निश्चित केले.
मुंबई : नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देताना याचिकेची सुनावणी पुढील आठवड्यात घेण्याचे निश्चित केले आहे.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी वाटप तत्त्वाच्या आधारे गंगापूर समुहातून ५०० दशलक्ष घनफूट दारणा समूहातून २६४३ दशलक्ष घनफूट मुळा समूहातून २१००, प्रवरा समूहातून ३३६० असे नाशिक व नगर जिल्ह्यातून एकूण ८६०३ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडण्याचा निर्णय घेतला, तसा आदेश जारी केला. या निर्णयाला आक्षेप घेत दिवंगत राजाभाऊ तुंगार सहकारी उपसा सिंचन संस्थेचे अध्यक्ष संजय तुंगार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून जोरदार विरोध केला.
नाशिकमध्ये दुष्काळीस्थिती असताना नाशिक व नगर धरणांमधील पाणी मराठवाड्याला सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. हा निर्णय रद्द करावा व याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी याचिकेत करण्यात आली आहे. ही याचिका मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाच्या निर्दशनास आणून देत त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र, खंडपीठाने शुक्रवारी सुनावणी घेण्यास नकार देत याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात घेण्याचे निश्चित केले आहे.
Web Title: Objection to release of water in Jayakwadi dam, refusal to hold an urgent hearing
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App