पुणे : कोरोनाचा नवा प्रकार असलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron vaccine) वर देखील प्रतिबंधात्मक लस तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पुण्यातील ‘जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स’ कडून ही लस तयार केली जात आहे. ‘एम.आर.एन.ए.’ तंत्रावर आधारित या लसीची मानवी चाचणी लवकरच सुरू केली जाणार आहे. यामध्ये लसीची प्रतिकारक्षमता आणि परिणामकारकता पाहिली जाणार असून, त्यानंतरच त्याच्या वितरणाला परवानगी दिली जाईल.
सध्या आढळणाऱ्या रुग्णांपैकी 85 टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. या आधीच्या लसी करोनाचा मूळ विषाणू, डेल्टा आणि त्याच्या उपप्रकारावर प्रभावी आहेत. मात्र नव्याने आलेल्या ‘ओमायक्रॉन’ने संसर्गाचे आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले असून तो सर्वाधिक वेगाने संसर्गित होणारा स्ट्रेन ठरला आहे. तो डेल्टाच्या तुलनेत कमी घातक जरी असला, तरी संसर्गक्षमता जास्त असल्याने अनेकजण वेगाने बाधित होताना आढळून येत आहेत. त्यामुळे त्यावर लस तयार करणे गरजेचे बनले आहे. त्या दृष्टीने पुण्यातील ‘जिनोव्हा फार्मास्युटिकल’ कंपनी या प्रयत्नात लागली आहे.
ही कंपनी कोरोनाच्या डेल्टा विषाणूवर प्रभावी ठरलेल्या दोन डोसची ‘एमआरएनए’ या तंत्रावर आधारित लस विकसित करत आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सध्या सुरू आहे. तर या कंपनीने या आधी लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी 3 हजार स्वयंसेवकांवर पूर्ण करून संपूर्ण डेटा केंद्राकडे सादर केला आहे. त्यानंतर लवकरच तिसऱ्या टप्प्यातील चाचणी देखील सुरू आहे. केंद्राकडून परवानगी मिळाल्यानंतर या लसीला कंपनी बाजारात आणणार आहे.
याआधी भारत बायोटेकने कोवॅक्सिनचा बूस्टर डोस हा ओमायक्रॉनच्या अँटिबॉडी निष्क्रिय करीत असल्याचा दावा केला आहे. माञ याबाबतचा डाटा हा लसीकरण नियमक विभागाकडून अद्याप पडताळणी होणे बाकी आहे. संपूर्ण जगभरात ऍस्ट्रेझेनेका, मॉडर्ना, सिनोफार्म, गमेलिया, नोवोवॅक्स या कंपन्यांकडूनही त्यांची ओमायक्रॉनवरील परिणामकारकता तपासली जात आहे. याचबरोबर फायजरने देखील मार्चमध्ये त्यांची ‘एमआरएनए’ तंत्रावर आधारित लस बाजारात येईल, अशी घोषणा केलेली आहे.
Web Title : After Corona, now the vaccine will also be released on ‘Omicron’