Panvel Crime : पनवेल शहरातील खंडेश्वर पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या छापेमारीत पोलिसांनी तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दोघांना अटक केली आहे. त्याचप्रमाणे सहा जणींची सुटका केली आहे. संबंधित आरोपी परराज्यातील रहिवासी असून त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने 5 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास खंडेश्वर पोलीस आता करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पनवेल येथील खन्दा कॉलनी परिसरातील एका इमारतीत वेश्याव्यवसाय सुरू होता. याठिकाणी काही तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने संबंधित ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी दोन दलालांना अटक करीत सहा तरुणींची सुखरूप सुटका केली.
संबंधित तरुणींना दिल्ली, आगरा, उत्तर प्रदेश, राजस्थानच्या विविध ठिकाणाहून आणल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. संबंधित तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. आरोपी पीडित तरुणींचे फोटो ग्राहकांना पाठवून त्यांना या ठिकाणी आणत असत. याबदल्यात ग्राहकांकडून मोठी रक्कम घेतली जात होती. ज्यामधून आरोपींना काही कमीशन मिळत होतं. आरोपींकडून पीडित मुलीच्या शरीराचा दररोज सौदा केला जात होता.
या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर खंडेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी मुंबई गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापेमारी करत सहा तरुणींची सुटका केली आहे. मात्र या महिलांना आता महिला सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी बिहार तर दुसरा आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. या सेक्स रॅकेट प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
Panvel Crime : Sex racket busted by police