संगमनेर: गुन्हा दाखल केल्याच्या रागातून एकास बेदम मारहाण
Sangamner Crime: गुन्हा दाखल केल्याच्या रागातून सात ते आठ जणांनी फिर्यादीच्या नातेवाईकाला राहत्या घरातून बाहेर ओढून बेदम मारहाण केल्याची घटना.
संगमनेर: आश्वी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याच्या रागातून सात ते आठ जणांनी फिर्यादीच्या नातेवाईकाला राहत्या घरातून बाहेर ओढून बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील आश्वी बद्रूक येथे सोमवार (ता. २१) रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले तर इतर आरोपी पसार झाले आहेत.
सोमवार (ता. २१) रोजी आश्वी बुद्रूक येथील अनिल जऱ्हाड याने बंटी साहेबराव मदने विरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या रागातून बंटी मदने याने त्याच दिवशी रात्री साडेदहाच्या सुमारास सात ते आठ जणांसह अनिलचे चुलते अशोक जऱ्हाड यांच्या घरात प्रवेश केला. बंटी
मदने याने अश्लिल शिवीगाळ करीत जऱ्हाड यांना घरातून ओढत बाहेर आणून त्यांना ठार मारण्याची धमकी देत लाथाबुक्क्या व लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. तसेच त्यांना जवळच्या विहिरीत उचलून टाकण्याचा प्रयत्न करीत असताना, आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने हल्लेखोरांच्या टोळक्याने पलायन केले.
याबाबत आश्वी पोलिस ठाण्यात विविध कलमांसह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे आरोपी बंटी साहेबराव मदने, लखन साहेबराव मदने (दोन्ही रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर), विजय दशरथ खेमनर (रा. ओझर, ता. संगमनेर) व इतर ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: A person was brutally beaten out of anger for filing a Crime case
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App