पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेमार्गाचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याचे निर्देश
Pune Nashik High Speed Railway: मेट्रो कायद्यानुसार महारेलच्या माध्यमातून पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे निर्देश (Ajit pawar).
संगमनेर: नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेमार्ग पूर्ण करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यातील अडचणी दूर करण्यात याव्यात. या अनुषंगाने पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे-नाशिक ग्रीनफिल्ड ब्रॉडगेज हायस्पीड रेल्वेमार्गासंदर्भात काल मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीस आमदार अतुल बेनके, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, व्यवस्थापकीय संचालक (महारेल) राजेशकुमार जैसवाल तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पुणे-नाशिक रेल्वेमार्ग करण्याबाबत गेल्या 25 वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, विविध कारणांमुळे हा मार्ग तयार करण्याचे काम रेल्वेला शक्य झाले नाही. त्यामुळे हा मार्ग मेट्रो कायद्यानुसार महारेलच्या माध्यमातून पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले आहे.
पुणे व नाशिक या जिल्ह्यांसाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून अद्याप मान्यता मिळाली नसल्याने त्याची रखडपट्टी झाली आहे; मात्र या प्रकल्पाला गती देण्यासाठी ‘महारेल’ ही राज्य सरकारची कंपनीच पुढाकार घेणार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘महारेल’ला तातडीने हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता तरी या प्रकल्पाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Web Title: Proposal of Pune-Sangamaner-Nashik Railway before the Cabinet Ajit Pawar
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App