संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गा बनतोय मृत्यूचा सापळा! सोळा दिवसांत आठ जणांचा मृत्यू
Pune Nashik Highway Accident: सोळा दिवसांत महामार्गावर तीन अपघात आणि त्यात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातून जाणारा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या सोळा दिवसांत महामार्गावर तीन अपघात आणि त्यात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे.
यापूर्वी चौपदरीकरण नसल्याने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघात होत असत. यामध्ये अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. यामुळे वारंवार वाहतूकही ठप्प होत असे. छोट्या-मोठ्या वाहनचालकांसह प्रवाशीही अक्षरशः वैतागून जात असत. त्यामुळे चौपदरीकरण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण कमी होईल, असे सर्वांना वाटत होते.
मात्र, महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही अपघातांची शृंखला कायम आहे. टोल प्रशासन वाहनचालकांकडून भरमसाट टोल वसुली करते. मात्र, त्या पद्धतीने म्हणावा तशा उपायोजना केल्या जात नाही. कधी पथदिवे बंद, उपरस्ते (सर्व्हिस रोड) अपूर्ण अवस्थेत, ठिकठिकाणी खड्डे, तर अपघात झाल्यानंतर मदत मिळण्यातही उशीर होत असतो, अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे सातत्याने महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
रविवारी (ता.३) एकोणावीस मैल-खंदरमाळ (ता. संगमनेर) येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला होता. यामध्ये मालवाहू कंटेनरच्या धडकेत चार वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अनेक वारकरी जखमीही झाले होते. त्यानंतर घुलेवाडी शिवारात गॅस टाक्यांचा ट्रक ट्रक कारवर पलटी होऊन भीषण अपघात झाला होता. यामध्ये तिघे जखमी झाले होते.
ही घटना ताजी असतानाच पुन्हा रविवारी (ता.१७) संध्याकाळी चंदनापुरी येथे मालवाहू ट्रक थेट कारवर कोसळला. त्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. या घटनांनी सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संगमनेर तालुक्यात या महामार्गावर सातत्याने अपघात होत असतात मात्र उपाययोजना शून्य आहे.
दरम्यान, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सोळा दिवसांत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यावरून अपघात रोखण्यासाठी संबंधित विभाग कमी पडत असल्याचेच स्पष्ट होत आहे. त्यासाठी तत्काळ उपाययोजना करून दिलासा देण्याची गरज आहे.
Web Title: Pune-Nashik highway is becoming a death trap Eight people died
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App