राहुरीत दोन ठिकाणी दूध भेसळीवर छापे , २५ गोण्या व्हे. पावडर व कृत्रिम दूध जप्त
Ahmednagar News: अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाची कारवाई (Raid).
राहुरी : राहुरी तालुक्यातील शिलेगाव व माहेगाव या दोन ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये २५ गोण्या व्हे. पावडर व कृत्रिम दूध जप्त करण्यात आले. कारवाई सुरू असताना अडथळा आणल्याने शिलेगाव येथील एकाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे विजय विठ्ठल कातोरे या आरोपीच्या घराजवळच्या गोठ्यात काल शुक्रवारी सकाळी ७ वाजता अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी येथून २५ गोण्या व्हे. पावडर व कृत्रिम दूध जप्त करण्यात आले. येथे कारवाईदरम्यान अडथळा आणल्याने विजय कातोरे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी कारवाई राहुरी तालुक्यातीलच माहेगाव येथे करण्यात आली. येथील एका व्यक्तीच्या गोठ्यात छापा टाकण्यात आला. तेथेही व्हेपावडर मिळून आली. राहुरी तालुक्यात वरील ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूध भेसळ होत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय नारगुडे, मनिष सानप, अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे, प्रदीप कुटे, प्रदिप पवार, नमुना सहायक प्रसाद
कसबेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत विजय विठ्ठल कातोरे याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दूध भेसळीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली. राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दूध भेसळ सुरू असून तालुका दूध भेसळीचे आगार बनला आहे.
कारवाई केली, पण तपास नाही
राहुरी तालुक्यात तांदुळवाडी येथे गेल्या ८ ते ९ महिन्यांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला होता. त्यावेळी लिक्विड पॅराफीन या घातक द्रव्यासह केमिकलयुक्त कृत्रिम दूध, व्हे. पावडर जप्त करून दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु या प्रकरणी कोणताही तपास झाला नाही. हे दूध कुठे जात होते, भेसळीचे साहित्य कोठून आणले होते, याचाही तपास झाला नाही. हे प्रकरण राजकीय दबाव टाकून मिटविले गेले की काय? अशी शंका सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
Web Title: Raid on milk adulteration at two places in Rahuri
(आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App