मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आले आहेत. मुंबईच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी MIG Club येथे महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनिती ठरविण्याबाबतची चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठीच या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीकरिता पक्षातील नेते, सरचिटणीस आणि शहर अध्यक्षांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या बैठकीनंतर लगेचच मुंबईत राज ठाकरे यांच्या सभेचं आयोजन होणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे.
राज्यातील आगामी महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी याआधीच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यासाठी मध्यंतरी त्यांनी महाराष्ट्र दौऱ्याचं नियोजन केलं होतं. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. तसेच त्यांनी पुण्याचाही दौरा केला आहे. तसेच ते मागील अनेक दिवसांपासून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. पक्ष वाढी करिता महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.
मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत माहिती दिली होती. राज ठाकरे यांच्या औरंगाबाद आणि पुणे दौऱ्यानंतर ते उर्वीरित राज्यातही दौरे करणार असल्याचं नांदगावकर यांनी सांगितलं आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे आगामी काळात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही भेटी देणार आहेत.
Web Title : Raj Thackeray’s speech in Mumbai on the backdrop of municipal elections