मुंबई : मागील काही दिवसांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या लवकर बऱ्या होऊन घरी परताव्यात यासाठी देशभरात सर्वजण प्रार्थना करत आहेत. लतादीदींच्या बाबतीत एक मोठी बातमी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, लता दीदींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येत आहे. मागील 15 दिवस त्या व्हेंटिलेटरवर होत्या. मात्र आता त्यांचं व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आलेलं आहे. न्यूमोनिया आणि कोरोनातून लता दीदी आता बऱ्या झालेल्या आहेत. सध्या ब्रेन इन्फेक्शनमध्ये सुधारणा करण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता त्या थोडं बोलूही शकत आहेत. शिवाय डॉक्टरांना त्या प्रतिसादही देत आहेत. सध्या काही प्रमाणात त्यांना अशक्तपणा असून त्यावर उपचार सुरु असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं आहे.
शनिवारी लता मंगेशकर यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट देण्यात आली होती. लतादीदींची तब्येत हळूहळू सुधारत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं होतं. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर प्रत्येक क्षणी नजर ठेवून आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रतीत सामदानी यांनी याबाबत काल महत्त्वाची माहिती दिली होती. लता मंगेशकर आता कोरोनामुक्त झाल्या असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होतेय. त्यांचा व्हेंटिलेटरचा सपोर्टही काढण्यात आला असून आता सध्या त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.
Web Title : Rajesh Tope gave important information that Lata Mangeshkar has recovered from Corona