तरुणीवर अत्याचार करून तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याचा प्रयत्न

राहता: राहता तालुक्यातील वाकडी येथील तरुणीवर अत्याचार करण्यात आला असून पिडीतेच्या कुटुंबीयावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. यामधील मुख्य आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्यास अद्याप अटक करण्यात आली नाही.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राहता तालूक्यातीळ वाकडी हद्दीतील चितळी राहता रस्त्यावर एका वीट भट्टीवर परप्रांतीय कुटुंबीय राहत असत. येथील एका तरुणीला शेजारील एक मुलगा दोन वर्षापासून अत्याचार करत होता.
या तरुणीस या मुलाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने ही बाब कोणासही सांगितली नाही. मात्र काही दिवसांत त्रास देण्यास वाढ झाल्याने हा सर्व प्रकार आपल्या भावास सांगितला.
त्यानंतर आरोपी मुलगा व मुलीचा भाऊ यांच्यात वाद झाले. गुरुवारी ६ मे रोजी या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामध्ये आरोपी मुलगा व त्याच्या सात ते आठ मित्रांनी पिडीत मुलगी व तिच्या कुटुंबीयास बेदम मारहाण केली. पिडीत मुलीचे नातेवाईक वाद सोडविण्यासाठी आले असता त्यांनादेखील तिक्ष्ण हत्याराने बेदम मारहाण केली. यामधील सहा नातेवाईकांना श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात आकाश अशोक गोरे, कृष्णा राजेंद्र तासकर, अशोक साहेबराव गोरे, विशाल राजेंद्र तासकर, अभिषेक राजेंद्र तासकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. अधिक तपास श्रीरामपूर पोलीस अधीक्षक संदीप मिटके हे करीत आहे.
Web Title: Rape girl and Attempt to kill her family
















































