Home अहिल्यानगर रोहित पवारांना कर्जतमध्ये दुसरा धक्का, आधी नगराध्यक्षांचा राजीनामा, आता….

रोहित पवारांना कर्जतमध्ये दुसरा धक्का, आधी नगराध्यक्षांचा राजीनामा, आता….

Breaking News | Rohit Pawar: रोहित पवार यांना मोठा धक्क्का मानला जात आहे.  विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या गटाचा नगराध्यक्ष कर्जत नगर पंचायतीमध्ये होणार असल्याचे स्पष्ट .

Rohit Pawar's second setback in Karjat, first the mayor resigns now

कर्जत: कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांनी अविश्वास ठरावावर मतदान होण्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना बसलेल्या पहिल्या धक्क्यांपाठोपाठ आता दुसरा धक्का बसला आहे. कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा गट नेता बदलण्याची मागणी नगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आसिया यांनी फेटाळली आहे.

कर्जत नगरपंचायतीतील शरद पवार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह काँग्रेस व भाजपच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष राऊत यांच्यावर अविश्वास दाखल केला होता. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे त्यांना पाठबळ होते. मात्र, या अविश्वास ठरावावर मतदान व निर्णय करण्यासाठी आयोजित सभेपूर्वीच नगराध्यक्ष राऊत यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ती प्रक्रिया झाली नाही. आता नव्याने नगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया होणार आहे. या पार्श्वभूमीवर, कर्जत नगर पंचायतीमधील आ. रोहित पवार गटाच्या कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस गटनेता बदलण्याची मागणी या गटाने जिल्हाधिकारी डॉ. आसिया यांच्याकडे केली होती. त्यामध्ये अमृत काळदाते यांना गटनेता म्हणून नोंदविण्यातबाबत सुचवण्यात आले होते.

जिल्हाधिकारी डॉ. आसिया यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर गटनेता बदलाबाबत आ. पवार गटाची असणारी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावून कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे गटनेते म्हणून संतोष मेहत्रे व उपनेते म्हणून सतीश पाटील यांची असणारी नेमणूक कायम ठेवली आहे. जिल्हाधिकारी डॉ. आसिया यांच्या या आदेशामुळे आ. पवार गटाची कर्जत नगरपंचायतीमधून सत्ता जाणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. आ. पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. या आदेशामुळे मेहत्रे यांना गटनेते म्हणून कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या सर्व सदस्यांना व्हीप बजावता येणार आहे. जे नगरसेवक कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये व्हिप विरोधात मतदान करतील, त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे.

दरम्यान, रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या गटाने काळदाते यांची गटनेतेपदी व प्रतिभा भैलुमे यांची उपगटनेतेपदी निवडीसाठी अर्ज केला होता. 26 मार्च रोजी झालेल्या गटाच्या नगरसेवकांच्या झालेल्या सभेत हा निर्णय झाल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, यास रोहिणी घुले व अन्य 10 नगरसेवकांनी आक्षेप घेतला. 26 मार्चला गटाची कोणतीही सभा झाली व गटनेते बदलाचा कोणताही निर्णय झाला नसल्याचा दावा त्यांनी केला होता. यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे 25 एप्रिलला सुनावणी झाली. त्यावेळी 11 नगरसेवकांनी 26 मार्चची सभा झाली नसल्याचे स्पष्ट केले तर गट नोंदणी करतेवेळी अंगठा उमटवणाऱ्या नगरसेविकेने आता आपण अंगठा वापरत नाही तर सही करतो, असे स्पष्ट करून गट नेता बदलाच्या बैठक झाली नसल्याचे स्पष्ट केले. रोहित पवार गटाच्या 15 नगरसेवकांपैकी 11 जणांनी 26 मार्चची सभा झाली नसल्याचे स्पष्ट केल्याने तसेच गट नेता बदल अर्ज करणारे अमृत काळदाते हे 26 मार्चची सभा झाल्याचे सिद्ध करू शकले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी गटनेता बदलाचा अर्ज निकाली काढला. दरम्यान, या घडामोडीमुळे आता विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या गटाचा नगराध्यक्ष कर्जत नगर पंचायतीमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: Rohit Pawar’s second setback in Karjat, first the mayor resigns now

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here