संगमनेर तालुक्यातील घटना: ट्रॅक्टर अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील वाघापूर येथे शेतातील रस्त्याच्या वादातून दोन कुटुंबातील वादातून मंगळवारी दुपारी वादावादीचे रुपांतर हाणामारी होऊन आरोपींनी फिर्यादीला थेट ट्रॅक्टर खाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेत वाघापूर येथील दोन सख्खे भाऊ व एक चुलत भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकास अटक करण्यात आली असून दोघे जण पसार आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल भागवत शिंदे रा. वाघापूर याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी अनिल शिंदे व त्याच्याच जवळ राहणारे चुलत भाऊ विक्रम ज्ञानदेव शिंदे, अजित संपत शिंदे, राहुल संपत शिंदे सर्व रा. वाघापूर यांच्याशी शेतातील रस्त्यावरून काही महिन्यांपासून वाद सुरु होता. या रस्त्याच्या वादावरून नेहमीच भांडणे व कलह होत होता.
मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास फिर्यादी अनिल शिंदे हे आरोपी ज्ञानदेव शिंदे यांच्या शेतातून जात असताना ज्ञानदेव शिंदे यांनी अनिल शिंदेच्या अंगावर थेट ट्रॅक्टर घातला. यामध्ये अनिल शिंदे ट्रॅक्टर च्या मधोमध खाली पडले. जमिनीला चिटकून राहिले मात्र पाठीमागे नांगरणे असल्याने त्याच्या उजव्या गुडघ्या जवळ व मानेला नांगर घुसून जबर दुखापत झाली. तो जिवंत राहिला म्हणून तीनही आरोपींनी बेदम मारहाण केली.
या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अनिलला वाचविले. या हाणामारीत तो गंभीर जखमी झाल्याने शहरातील विखे हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी तीनही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विक्रम ज्ञानदेव शिंदे यास अटक केली आहे. दोन जण फरार आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माळी हे करीत आहे.
Web Title: Sangamner Attempt to kill by putting a tractor on