संगमनेर: हिवरगाव टोलनाक्यावर रिव्हाल्वरचा धाक दाखवून टोल कर्मचाऱ्यास धमकी
संगमनेर | Sangamner News: कर्मचाऱ्याने टोल मागितल्याच्या कारणावरून एका वाहन चालकाने थेट रिव्हाल्वर काढून तु मला ओळखले नाही माझ्याकडे टोल मागतो आता तुला वरच पाठवितो अशी धमकी देत टोल भरण्यास नकार दिल्याप्रकरणी इनोव्हा कार चालकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नाशिक पुणे राष्ट्रीय मार्गावरील संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या टोल नाक्यावर शनिवारी दुपारी घडली.
याप्रकरणी टोल नाका कर्मचारी याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुण्याहून नाशिककडे जाणारी इनोव्हा कार क्रमांक एम.एच. १२ जे. झेड. २९५५ शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हिवरगाव पावसा टोल नाक्यावर थांबली असता टोल कर्मचारी गोकुळ सोपान नेहे यांनी या कार चालकाकडे टोलची मागणी केली असता कार चालक गणेश कोते याने माझ्याकडे फास्ट टॅग आहे असे म्हणत तेथून जाण्याचा प्रयत्न केला. कर्मचारी नेहे यांनी गाडीला असलेला फास्ट टॅग शोधण्याचा प्रयत्न केला असता याचा राग आल्याने कार चालक गणेश कोते याने थेट रिव्हाल्वर काढून कर्मचारी नेहे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मी कोण आहे हे तुला माहित नाही. तू माझ्या गाडीला हात का लावाला तुला आताच वर पाठवितो असे म्हणून टोल भरण्यास नकार दिला. याप्रकरणी गणेश कोते विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: sangamner News Threatening a toll worker at Hivargaon toll plaza