संगमनेर: कर्जदाराची फसवणूक, बँक व्यवस्थापक, अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
संगमनेर | Crime: जमीन शेतजमीन असतानाही बँकेचा व्यवस्थापक व अधिकारी यांनी जमीन बिनशेती भासवून कर्जदाराची आर्थिक फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. उद्योग व व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या नवी मुंबई येथील कर्जदाराची फसवणूक करणाऱ्या बँकेच्या शाखाधीकार्यासह एका अधिकाऱ्याविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नितीन अंबादास पिसे उद्योजक रा. वाशी नवी मुंबई यांनी फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पंढरीनाथ तराळ बँक व्यवस्थापक मुंबई व ज्ञानदेव सुराजी मते अधिकृत अधिकारी रा. ठाणे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.
पिसे यांचा कागदी पिशव्या बनविण्याचा उद्योग आहे. त्यांनी उत्पादन वृद्धीसाठी नवीन युनिट घेण्याकरिता बँकेच्या तुर्भे (मुंबई) शाखेकडे कर्जाची मागणी केली होती. दोन वेगवेगळ्या खात्यात प्रत्येकी ६ लाख याप्रमाणे १२ लाख रुपयांची रक्कम बँकेकडून त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली. मात्र पिसे यांना खात्यात जमा झालेली कर्जाची रक्कम तांत्रिक कारणामुळे काढता येत नव्हती. दरम्यान पिसे यांना बँकेचा व्यवस्थापक तराळ याने कर्जाच्या थकबाकीपोटी बँकेने जप्त केलेल्या संगमनेरातील कागदी बॉक्स बनविणाऱ्या एका कारखान्याची माहिती दिली. सदर कारखाना चालविण्यास घ्या असे त्यांनी पिसे याना सुचविले.
१२ लाखांचे मंजूर झालेले कर्ज मिळत नसल्याने पिसे यांनी ६५ लाखांत कारखाना घेण्याची तयारी दाखविली. पिसे यांच्या प्रकरणाकरिता अधिकृत अधिकारी म्हणून मते याची नेमणूक करण्यात आली होती. त्याने ९ मार्च २०१६ ला पिसे यांना संगमनेरात बोलावून दुय्यम निबंधाकडे विक्रीपत्रासह विक्री प्रमाणपत्र व इतर सर्व कागदपत्रे तयार केली. सदरची मिळकत बिनशेती नमूद करण्यात आली होती. सदरच्या मिळकतीचे बँकेच्या नावाने गहाण खतही नोंदवून घेण्यात आले. त्याच दिवशी सायंकाळी संगमनेरातील बॉक्स कारखाना पिसे यांच्या नावावर होऊन त्यांच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम वर्ग झाली व लागलीच ती बँकेने मिळकतीच्या पोटी वळवून घेतली. यानानंतर ऑगस्ट २०१८ पर्यंत पिसे यांनी कारखाना चालविला. मात्र डिसेंबर २०१८ मध्ये त्यांना संगमनेर तहसील कार्यालयाकडून नोटीस बजाविल्याने सदरची जागा अनधिकृत बिनशेती असल्याचे त्यांना समजले. त्यापोटी थकीत महसुलाची मागणी करण्यात आली.
पिसे यांनी माहिती अधिकाराचा वापर करून त्या जमिनीबाबत माहिती मिळविली. असता ती जमीन शेतजमीन असताना बँकेचा व्यवस्थापक तराळ व अधिकारी मते यांनी जमीन बिनशेती भासवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले,त्यानी याबाबत बँकेत जाऊन विचारणा केली असता तारल याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पिसे यांनी या दोघांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली.
Web Title: Sangamner:Debt fraud crime filed