निवडणुकीची चाहूल लागताच खळबळजनक घटना, कोऱ्या करकरीत बनावट 500 रुपयांच्या नोटा जप्त
Breaking News | Nashik Crime: नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत मालेगाव परिसरात 10 लाख रुपयांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

मालेगाव: ही मोठी कारवाई मालेगाव तालुका पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील ए-वन सागर हॉटेलसमोर केली. या प्रकरणात मध्य प्रदेशातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, बनावट नोटांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मालेगाव पोलिसांना बुधवारी (दि. 29 ऑक्टोबर) गोपनीय माहिती मिळाली की, काही परप्रांतीय व्यक्ती बनावट चलनी नोटा विक्रीसाठी मुंबई-आग्रा महामार्गावर येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी ए-वन सागर हॉटेलजवळ सापळा रचला. या वेळी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. नाजीर अक्रम मोहम्मद अय्यूब अन्सारी (वय 34, रा. मोमीनपुरा, बुरहानपूर, मध्य प्रदेश), मोहम्मद जुबेर मोहम्मद अश्रफ अन्सारी (वय 33, रा. हरीरपुरा, वॉर्ड क्र. 31, बुरहानपूर, मध्य प्रदेश) अशी संशयितांची नावे आहेत. दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी 500 रुपयांच्या 2,000 बनावट नोटा (एकूण किंमत 10 लाख रुपये), दोन मोबाईल हँडसेट आणि एक सॅक असा मिळून 10 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी मोहम्मद जुबेर अन्सारी हा मौलाना असून मदरशांमध्ये शिक्षण देण्याचे कार्य करतो, अशी माहिती समोर येत आहे. बनावट नोटांच्या मागे कोणते नेटवर्क कार्यरत आहे आणि त्या कुठून आणल्या व कुठे विक्रीसाठी नेल्या जात होत्या, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. राज्यात निवडणुकांची चाहूल लागलेली असतानाच बनावट नोटांचा मोठा साठा जप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Breaking News: sensational incident as soon as the election is announced, fake 500 rupee notes seized
















































