मुंबई : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी 2017 मध्ये साकारलेल्या ‘वाय आय किल्ड गांधी?’ (Why i killed Gandhi) या चित्रपटामुळं आता पाच वर्षांनंतर नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात कोल्हेंनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्यामुळं त्यांना राष्ट्रवादीतील काही बड्या नेत्यांनीच घरचा आहेर दिला आहे. वादाला अधिक पेव फुटलेले असतानाच आता खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा, शरद पवार (Sharad Pawar) यांनी सदर प्रकरणी स्वतःची तसेच पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
‘गांधींवर आधारित एक सिनेमा काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता जो अमेरिकेतही प्रसिद्ध झाला होता. गांधींचं महत्त्वं त्यामुळं संपूर्ण जगाला कळलं’, असं शरद पवार म्हणारे. त्या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेंची भूमिका साकारणारा व्यक्ती हा कलाकार असून ते स्वतः गोडसे नव्हते. त्यामुळं लोकांनी कलेच्या नजरेतूनच त्या भूमिकेकडे पहावं, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. आपल्या वक्तव्याला आधार देणारी काही उदाहरणं त्यांनी यावेळी सर्वांसमोर मांडली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात जो संघर्ष झाला, त्यावर चित्रपट साकारला गेला. समजा राजा शिवाजी चित्रपटात कोणी एक कलाकार महाराजांची भूमिका साकारतो तर दुसरा कलाकार औरंगजेब साकारतो. याचा अर्थ तो औरंगजेब साकारणारा मुघल साम्राज्याचा पुरस्कर्ता होत नसून तो कलावंत म्हणून त्या भूमिकेला साकारत असतो’, असं उदाहरण त्यांनी दिले. याचबरोबर रामराज्याचं उदाहरणही त्यांनी दिलं. अशा चित्रपटामध्ये रावण साकारणारी व्यक्ती प्रत्यक्ष रावण नसून, कलाकार असतो हे लक्षात घ्यावं. त्यामुळं अमोल कोल्हे यांनी ही भूमिका स्वीकारली असेल तर ती कलाकार म्हणून स्वीकारली आणि साकारली असा स्पष्ट विचार त्यांनी मांडला.
ज्यावेळी 2017 मध्ये त्यांनी ही भूमिका साकारली होती तयावेळेस ते पक्षातही नव्हते. एक कलावंत म्हणून भूमिका साकारली याचा अर्थ ते गांधीजींविरोधात आहेत असा त्याचा अर्थ निघत नाही. असंही शरद पवार यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं आहे. एक कलावंत आणि देशात घडलेला एक इतिहास या दोन गोष्टींना समोर ठेऊनच आपण व्यक्त झालं पाहिजे असेही ते म्हणाले.
Web Title : Sharad Pawar spoke on the role of Godse played by Amol Kolhe