संगमनेर: बसमधून धूर अन प्रवाशांची धांदल
Breaking News | Sangamner: चालत्या बसचा प्रेशर पाईप फुटल्याने बसमधून धूर निघू लागल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या.
संगमनेर: चालत्या बसचा प्रेशर पाईप फुटल्याने बसमधून धूर निघू लागल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्या. प्रसंगावधान राखून चालकाने बस थांबवल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना बुधवारी (दि २०) सकाळी अकरा वाजता तालुक्यातील घारगाव गावात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी: नाशिक-पुणे महामार्गावर तळेगाव डेपोची पुण्याहून नाशिककडे जाणारी बस (एमएच ४० एन ९४०६) घारगावजवळ आली, तेव्हा प्रेशर पाईप फुटून जोराचा आवाज आला. पाईप फुटल्याने बसमध्ये धूर निघू लागल्याने प्रवाशांनी चालत्या बसमधून उड्या मारायला सुरुवात केली. एकच घबराट आणि आरडाओरडा होऊन प्रवाशांची धावपळ सुरू झाली. चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला उभी केली. यानंतर सर्वच प्रवासी खाली उतरले.
चालक व वाहकाने बसची तपासणी केली असता प्रेशर पाईप फुटल्याचे लक्षात आले. यामुळे बस त्याच ठिकाणी थांबवावी लागली. प्रवाशांना यामुळे मनःस्ताप सहन करावा लागला. वेळीच ही घटना लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला; मात्र तीन दिवसांत घारगाव परिसरात बस नादुरुस्त होण्याची ही तिसरी घटना आहे.
Web Title: Smoke from the bus and passenger rigging
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study