डोंबिवली : शहरातील एका ४० वर्षीय इसमाने नैराश्याने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री ११च्या सुमारास डोंबिवली (Dombivli) पश्चिमेकडील स्टेशनजवळ असलेल्या ‘रोहिणी’ इमारतीत घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दशरथ चंद्रकांत पतंगराव (४०) (Dashrath Patangrao) असे आत्महत्या करणाऱ्या इसमा नाव आहे. दशरथ हा आपले आई वडील, बहीण आणि भावजय यांच्याबरोबर राहत होता. मात्र दशरथ हा बेरोजगार असून त्याच्या बहिणीचा इमारतीच्या खालीच पुष्प भांडाराचा व्यवसाय आहे. तिच्याच व्यवसायावर घराचा उदरनिर्वाह चालत असतो.
सोमवारी रात्री दशरथने कुटुंबियांसमवेत जेवण केल्यावर आपली प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले. इमारतीच्या पाचव्या मजल्यावर टेरेस आहे. कुटुंबीय घरी असताना दशरथने इमारतीच्या टेरेसवरील कठड्यावर उभा राहून सुरुवातीला केबलच्या वायरने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र केबलची वायर तुटल्याने इमारतीवरून खाली पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Web Title : Suicide from a terrace due to depression in Dombivli