सप्तशृंगी गडावरील कड्यावरून उडी मारुन महिलेची आत्महत्या
Nashik Suicide News: सप्तशृंगी गडावरील सतीच्या कड्यावरून उडी मारुन ३५ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना.
वणी : सप्तशृंगी गडावरील सतीच्या कड्यावरून उडी मारुन ३५ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मनीषा योगेश जगताप (वय ३५, रा. जाटपाडे, निमगाव ता. मालेगाव) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकलेले नाही. दरम्यान, या प्रकारामुळे सप्तशृंग गडावरील सतीचा कडा पुन्हा चर्चेत आला असुन या ठिकाणी पुर्णतः संरक्षक जाळी बसवुन उपाय योजना करण्याची होत आहे. पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, सप्तशृंग गडावरील सतीच्या कड्यावरुन एका महिलेने उडी मारल्याची माहीती सप्तशृंग न्याय व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ गडावरील आपत्ती व्यवस्थापन पथकास घटनेची माहीती दिली. त्यानुसार, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे मंगेश केदारे, संकेत नेवकर, सागर गावित, कृष्णा जोपले, नानाजी सोणवणे, ज्ञानेश्वर गावित, पराग कुलकर्णी यांच्या पथकाने शोधमोहीम राबविली. बराच वेळ शोध मोहीम राबविल्यानंतर महिला सापडली. पथकाने तिला तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भातोड्याचे पोलीस पाटील यांनी वणी पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस करीत आहे.
Web Title: Suicide of a woman by jumping from the cliff at Saptshringi Fort
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study