Home महाराष्ट्र कोरोनाच्या तिस-या लाटेपासुन आपल्या चिमुकल्यांना सांभाळा: एक सुंदर लेख जरूर वाचा  

कोरोनाच्या तिस-या लाटेपासुन आपल्या चिमुकल्यांना सांभाळा: एक सुंदर लेख जरूर वाचा  

Take care of your spark from the third wave of the corona

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रचंड कहर सुरू आहे. ही लाट आटोक्यात येताच तीन-चार महिन्यानंतर तिस-या लाटेचा धोका उभा राहणार आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबरपर्यंत देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते.  कोरोनाच्या संसर्गात लहान मुले आतापर्यंत बऱ्यापैकी सुरक्षित राहिली असली तरी सप्टेंबरच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका वाढेल, अशी शक्यता आहे. या लाटेत लहान मुलांना संसर्ग अधिक होण्याची शक्यता केंद्र सरकारच्या सल्लागारांनी वर्तवली आहे.  कोरोनाची पहिली लाट वृद्धांसाठी घातक ठरली होती. दुसऱ्या लाटेचा परिणाम तरुणांवर सर्वाधिक झाला. अशा स्थितीमध्ये कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. मात्र अशा परिस्थितीत घाबरून जाण्याची गरज नाही,  तर सरकारच्या आवाहनानुसार कोरोना नियमावलीचे पालन करण्याची नितांत गरज आहे.

 कोविडची तिसरी लाट युरोपच्या काही देशांमध्ये यापूर्वीही आली आहे आणि असे दिसून आले आहे की तिसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलांवर परिणाम झाला. भारतात तिसरी लाट आली तर आपण इथेही तसाच परिणाम पाहू शकतो. या आजारावर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नाही आणि सध्याच्या लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत मुलेदेखील कव्हर केलेली नाहीत. तज्ञांच्या इशा-यानंतर लहान मुलांना कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेपासून वाचवण्याची कसरत सुरू झाली आहे. महाराष्ट्रासहित अनेक राज्यांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड केयर सेंटर्स बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. लहान मुले एकटी उपचार केंद्रात राहू शकणार नाहीत. त्यामुळे लहान मुलांच्या वॉर्डमध्ये मुलाचे आई किंवा वडील केअर टेकर म्हणून थांबणे गरजेचे ठरणार आहे. या दृष्टीने येथे सुविधा निर्माण केल्या जात आहेत. ही केअरटेकर व्यक्ती कोविड निगेटिव्ह असेल तर त्या व्यक्तींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक नियमावली तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनांना यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.

कोरोना संसर्गामुळे भलेही सध्या मुलांमध्ये कोणतीही गंभीर समस्या उद्भवली नाही, तरीही कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे. भारतात कोरोनाची दुसरी लहरच लहान बाळांपासून १५ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी घातक ठरत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये लहान मुलं मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात आली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक आणि दिल्ली मध्ये एकूण ७,९६८८ मुले कोरोना संक्रमित झाली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२० मध्ये आलेल्या अहवालानुसार जगभरात ८ टक्के बालकं कोरोना संक्रमित आहेत. अशात तिसरी लाट आल्यास, ही लाट सर्वाधिक घातक लहान मुलांसाठीच ठरेल.

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची तीन प्रमुख कारणं-

पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आणि मध्यम वयोगटातील लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांच्या शरीरात अॅन्टीबॉडी तयार झाल्या आहेत. त्यांना आजार होणार नाही किंवा झाला तरी सौम्य स्वरूपाचा असेल. पण, लहान मुलांना कोरोना आजाराचा मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला नाही. देशात १८ वर्षावरील सर्वांना कोव्हिडविरोधी लस दिली जाणार आहे. लहान मुलांना लस अजून दिली जाणार नाही. पहिल्या लाटेत फार कमी लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला. दुसऱ्या लाटेत संख्या तुलनेने वाढली. पण, अजूनही कोट्यावधी मुलं आहेत ज्यांना संसर्ग झाला नाहीये. त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता खूप जास्त आहे.

लहान मुलांना कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेपासून वाचवण्याचा लसीकरण हा सर्वोत्तम उपाय आहे. भारतात १८  वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. १८ वर्षाखालील मुलांना या लसीकरणातुन वगळण्यात आलं आहे. भारतात लहान मुलांच्या चाचण्या पूर्ण झालेल्या नसल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. भारतातील वाढत्या कोरोना रुग्णांचा विचार करता १८ वर्षाखालील मुलांच्याही लसीकरणाबाबत तज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकृत सुत्रांच्या मते, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशनच्या विषय समितीच्या तज्ञांनी  भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लहान मुलांवरील चाचणीची शिफारस केली आहे. जर लहान मुलांवरील चाचण्या यशस्वी झाल्या तर लहान मुलांच्या लसीकरणासाठी देखील परवानगी देण्यात येईल.  देशातील विविध ठिकाणी एकूण ५२५  लहान मुलांवर ही चाचणी करण्यात येणार आहे.

 कॅनडा आणि अमेरिकेत लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीला परवानगी देण्यात आली आहे. कॅनडा सरकार लवकरच १२  ते १५ वर्ष वयाच्या मुलांचं लसीकरण सुरू करणार आहे. कॅनडाने या वयोगटाच्या मुलांसाठी फायझर लसीला मंजुरी दिली आहे. फायझरप्रमाणेच इतर लस उत्पादकही लहान मुलांवर लसीच्या चाचण्या घेत आहेत. शाळा सुरू करणे, कोरोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालणे आणि इतर आजार असलेल्या मुलांचं कोव्हिडपासून संरक्षण, यासाठी मुलांना विशेषतः किशोरवयीन मुलांना लस देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या दोघांकडूनही १२ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांवर लसीच्या चाचण्या सुरू आहेत. मॉडर्नाच्या चाचण्याचे निष्कर्ष लवकरच हाती येण्याची शक्यता आहे. तर यूकेमध्ये अॅस्ट्राझेनकादेखील ३००  मुलांवर लसीच्या चाचण्या घेत आहे. ६ ते १७ वर्ष वयोगटातल्या मुलांमध्ये लसीमुळे रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होते का, याचा संशोधक अभ्यास करत आहेत. लसीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात सर्व काही व्यवस्थित झाल्यास कॅनडा आणि अमेरिकेनंतर भारतातही २  ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक स्वदेशीलस लवकरच तयार असणार आहे. जगभरात अनेक देश आहेत जिथे लहान मुलांवरील  कोरोना प्रतिबंधक लशीची चाचणी केली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी कोव्हिडविरोधी लसीवरील पेटेंट सुरक्षा काढण्याच्या जागतिक व्यापार संघटनेच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास लस उत्पादकांचं लसीवरचं पेटंट रद्द होईल आणि त्यामुळे इतर औषध निर्मिती कंपन्यांना लसीचं उत्पादन करण्याची परवानगी मिळेल. असं झाल्यास लसीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि त्यामुळे गरीब देशांनाही परवडणाऱ्या दरात लस विकत घेण्यात मदत होईल.

तर लहान मुलांसाठी असलेल्या लसीच्या चाचण्या वेगाने सुरू आहेत. कोविडच्या पहिल्या लाटेत, मुलांना संसर्ग झाला परंतु त्यांना लक्षणे दिसली नाहीत, परंतु यावर्षी त्यांना आता ताप, अतिसार, सर्दी आणि खोकला ही लक्षणे दिसू लागली आहेत. जशी गंभीर लक्षणे घरातील वडीलधाऱ्यांमधे आढळतात तशी लक्षणेही आता मुलांमध्येही दिसू लागली आहेत. मुलांना या विषाणूचा त्रास फारसा वाटत नसला तरी, ते जास्तीत जास्त लोकांना हा संसर्ग पसरविण्याचं काम करू शकतात. सध्या तरी पालकांना त्यांच्या पाल्यांची काळजी घेऊन ते कुटुंबात कोरोनाचे सुपर स्प्रेडर होऊ नयेत याची काळजी घेण्याची गरज आहे. सध्याच्या लहान वयोगटासाठी लसीच्या ज्या चाचण्या केल्या जात आहेत त्या चाचण्या तिसरी लाट येण्यापूर्वी यशस्वी झाल्या तर बहुतांश धोके कमी होतील. पण सध्या तरी मुलांना एकत्र खेळणे टाळले पाहिजे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

लहान  मुलांची काळजी अशाप्रकारे घ्या :

१. उत्तम आरोग्यासाठी विविध प्रकारची औषधे आणि सप्लीमेंट घेणे चांगले नाही. त्याऐवजी प्रोटिन, कॅल्शियम आणि मिनरल्ससाठी आरोग्यदायी पदार्थ खाल्ले पाहिजेत.

२. पोषक तत्वे अधिक असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

 ३.  कुटुंबात मुलांनाही आपल्याबरोबर व्यस्त ठेवा.

 ४. आजकाल मुलांना शाळा किंवा बाहेर जाण्याची गरज नाही. त्यामुळे मुले गेम किंवा टीव्ही पाहतात. त्यांची दिनचर्या आरोग्यदायी  बनवा.

५. मुलांकडुन थोडा शारिरीक व्यायाम करून घ्या. त्यांना जंक फूड, फास्ट फूड आणि सॉफ्ट ड्रिंकचे सेवन करण्यास देवु नका. प्रोटीनयुक्त आहार लहान मुलांना द्या.

६. शाळकरी वयाच्या मुलांना हात स्वच्छ ठेवण्याची सक्ती करावी. लहान मुलांसाठी अल्कोहोलयुक्त हॅन्ड सॅनिटायझर वापरू नये त्याऐवजी साबणाचा वापर करावा.  मुलांना हात धुण्याची योग्य पद्धत शिकवावी. मुलांना जेवणाआधी व नंतर, शौचालयाचा वापर केल्यावर व बाहेरून खेळून आल्यावर हात धुण्यास सांगावे. त्यांना हात धुतल्यावर पुसण्यासाठी दुसरा छोटा नॅपकिन ठेवावा.

७. घरात कोणी कोरोना बाधित असेल तर त्याच्या संपर्कात लहान मुले येणार नाहीत याची काळजी घ्यावी.

 ८ . मुलांमध्ये कोविडची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

– सुरेश मंत्री

संपर्क- ९४०३६५०७२२

Web Title: Take care of your spark from the third wave of the corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here