Home अहमदनगर राहता: सत्तेसाठी पक्ष बदलणार्‍यांनी तालुका उद्ध्वस्त केला – शरद पवार

राहता: सत्तेसाठी पक्ष बदलणार्‍यांनी तालुका उद्ध्वस्त केला – शरद पवार

Ahmednagar Assembly Election 2024: लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला मोठी ताकद दिली. यामुळे राज्य सरकार घाबरले असून फक्त घोषणाबाजी करत आहे.

Taluka destroyed by party changers for power - Sharad Pawar

राहाता: सत्तेसाठी अनेक पक्ष बदलणार्‍यांनी एकेकाळचा समृद्ध राहाता तालुका उद्ध्वस्त केला आहे. ही सत्ताधार्‍यांची टोळी उद्ध्वस्त करण्यासाठीच प्रभावती घोगरे यांच्या रुपाने जनता सरसावली आहे. निळवंडे धरण व कालव्यांची कामे ही फक्त आ. बाळासाहेब थोरात यांनीच केली असल्याचे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी केले. राहाता येथील वीरभद्र मंदिरासमोरील प्रांगणात महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे नेते आ. बाळासाहेब थोरात, खा.भाऊसाहेब वाकचौरे, आ. डॉ. सुधीर तांबे, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राजेंद्र फाळके, करण ससाणे, रावसाहेब म्हस्के, सुधीर म्हस्के, बाळासाहेब गायकवाड, अ‍ॅड. नारायण कार्ले, सचिन चौगुले, पंकज लोंढे, सुहास वहाडणे, धनंजय गाडेकर, राजेंद्र बावके, आ. रिटा चौधरी, सिमोज जगताप, सुरेश थोरात, नवनाथ आंधळे, डॉ. एकनाथ गोंदकर, लताताई डांगे, शितल लहारे आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

खा. पवार म्हणाले, लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला मोठी ताकद दिली. यामुळे राज्य सरकार घाबरले असून फक्त घोषणाबाजी करत आहे. महिलांना पंधराशे रुपये देण्याऐवजी सुरक्षितता महत्त्वाची आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महिलांना तीन हजार रुपये तर बेरोजगार युवकांना चार हजार रुपये भत्ता देणार आहोत. अनेक वर्ष घरात सत्ता असूनही राहाता मतदार संघातील महत्त्वाचा नगर-मनमाड रस्ता या लोकांना करता आला नाही. रस्त्यावरून गेले तर सर्वांची हाडे खिळखिळी होतात. शेती महामंडळाच्या जमिनीवर नॉलेज सिटी उभारण्याचा प्रस्ताव मी दिला होता. पण त्याला स्वार्थासाठी येथील मंडळीने अडथळा निर्माण केला. सत्तेसाठी अनेक पक्ष बदलले. एकेकाळचा समृद्ध आणि वैभवशाली असलेला राहाता तालुका यांनी उद्ध्वस्त केला. या तालुक्यात दहशतवाद करणारी टोळी निर्माण झाली असून ती जनतेने उद्ध्वस्त करावी, असे सांगताना प्रभावती घोगरे या शंकरनाना खर्डे व चंद्रभान दादा घोगरे यांचा समृद्ध वारसा जोपासणार्‍या असून त्या माझी मुलगीच आहे.

राहाता येथील शिवाजी महाराजांचा पुतळा अनेक दिवस यांनी बंद करून ठेवला आहे. सिंधुदुर्ग मधील पुतळ्याला मोदींचा हात लागला आणि तो पुतळा कोसळला. महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणारी ही मंडळी असून यांना त्यांची जागा दाखवा, असे आवाहन त्यांनी केले. आमदार थोरात म्हणाले, या तालुक्यातील दहशतवाद मोडून टाकण्यासाठी ही स्वातंत्र्याची लढाई आहे. सर्वांनी प्रभावती घोगरे यांच्या पाठीशी उभे राहून हा तालुका गुलामगिरीतून मुक्त करावा. पेरूच्या बागा असलेला हा तालुका समृद्ध होता. परंतु कारखाना बंद झाला. बाजारपेठ उदास झाली. महागाई बेरोजगारी वाढली. हे सर्व असताना सोयाबीनचे भाव काय आहेत शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न आहेत. हे सर्व सोडून जातीयतेच्या प्रश्नावर राजकारण भाजपा नेवू पाहत आहे. सौ. घोगरे यांना भाषण बंदीची नोटीस देण्यापर्यंत घाबरले की काय, अशी विचारणाही आ. थोरात यांनी केली.

प्रभावती घोगरे म्हणाल्या, पुढील पाच वर्षात मी शेतकरी आणि साई संस्थानमधील कर्मचार्‍यांच्या प्रश्नासाठी भांडणार आहे. मी साधी गृहिणी असून मला कोणतेही साम्राज्य उभे करायचे नाही. पुढील पाच वर्षात निळवंडे धरणाचे पाणी सर्वांना देणे हेच काम शरद पवार, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

Web Title: Taluka destroyed by party changers for power – Sharad Pawar

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here