वर्गात शिकवताना शिक्षकाला हृदयविकाराचा धक्का, मृत घोषित
Aurangabad News: वर्गात शिकवत असताना शिक्षकाला हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना.
औरंगाबाद: औरंगाबादच्या लासूर स्टेशन परिसरातील जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एक धक्कादायक घटना घडली. विद्यार्थ्यांना वर्गात शिकवत असताना शिक्षकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी, 30 जानेवारी दुपारी दीडच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या शाळेतच ही घटना घडली आहे. सुरेश निवृत्ती राऊत (वय 43 वर्षे, मुळगाव-धोंदलगाव, ता. वैजापूर) असे या मृत शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे सुरेश राऊत हे शिक्षक विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांमध्ये सर्वांना प्रिय शिक्षकांपैकी एक होते. अत्यंत शिस्तीत व शाळेची वेळ पाळणारे राऊत गुरुजी अशी त्यांची वेगळी ओळख होती. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक आवडीचे शिक्षक म्हणून देखील त्यांना ओळखले जात होते. दरम्यान सोमवारी नेहमीप्रमाणे राऊत शाळेत आले होते. शाळेत आलेल्या राऊत यांनी प्रार्थना, परिपाठाला सर्वांसोबतच नित्यनियमाने हजेरी लावली होती. यावेळी त्यांना कोणताही त्रास देखील जाणवला नव्हता.
दुपारी दीड वाजता मध्यंतरात सहकारी शिक्षकांसोबत सुरेश राऊत यांनी जेवण केले. जेवण झाल्यावर ते वर्गात गेले. मात्र वर्गातच जाताच त्यांना भोवळ आली आणि ते जमिनीवर कोसळले. विद्यार्थ्यांनी राऊत भोवळ येऊन पडल्याचे पाहिले व लगेच इतर शिक्षकांना याची माहिती दिली. त्यामुळे शिक्षकांनी वर्गात धाव घेतली. तसेच ग्रामस्थ आणि शिक्षकांनी तात्काळ वाहनातून लासूर स्टेशनच्या खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. मात्र येथे डॉक्टरांनी तपासून सुरेश राऊत यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेबाबत परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Web Title: Teacher suffers Heart attack while teaching in class, declared dead
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App