अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा शिक्षक अखेर जाळ्यात
Breaking News | Nashik Crime: सूत्रांच्या माहितीनुसार, अपहरणकर्ता आणि अपहृत मुलीची पाच वर्षांपासून ओळख होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघे संगनमताने पळाल्याचे पोलिस तपासात समोर.
नाशिक : दोन वर्षांपूर्वी 16 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून पसार झालेल्या शिक्षकास शहर पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने नागपूरमधून पकडले आहे. पोलिसांनी अपहृत मुलीचीही सुटका करीत तिच्यासह अपहरणकर्त्यास आडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिसांनी वेशांतर करीत नागपूरमधील नवीन मंगलवाडी चौकातील शाळेतून शिक्षकास पकडले.
आडगाव परिसरातून 2022 मध्ये एका 16 वर्षीय मुलीचे अपहरण झाले होते. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन मुस्कान’ मोहिमेत अपहृत मुला-मुलींचा शोध घेतला जात आहे. त्यानुसार आडगाव येथील अपहृत मुलीचा शोध घेताना अपहणकर्ता नागपूर येथे असल्याचे पोलिसांना समजले.
नाशिक गुन्हे शोध पथकाने नागपुरातून आनंद किसनराव शिरसाठ (35, रा. नागपूर) या संशयिताला अटक केली आहे. तो खासगी शाळेत शिक्षक असून, त्याने 2022 मध्ये नाशिकच्या आडगाव परिसरातून सन 2022 मध्ये सोळा वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ‘ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत तपासाचे आदेश दिले. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी पथकाला तांत्रिक तपासाच्या सूचना केल्या.
खबऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार, अपहरणकर्ता नागपूरमधील शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत असल्याचे समजले. त्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहायक निरीक्षक प्रवीण माळी, महिला अंमलदार वैशाली घरटे यांनी वेशांतर करुन सापळा रचला. घरटे या विद्यार्थिनीच्या पालक म्हणून शाळेत शिरल्या. अल्पवयीन मुलगी शाळेत असल्याची खात्री झाल्यावर माळी यांनी संशयित शिरसाठचा ताबा घेतला.
विदर्भातील मूर्तिजापूर येथील पालकांनी सोळा वर्षीय मुलीला शिक्षणासाठी नाशिकमध्ये ओळखीच्यांकडे पाठवले. फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये तिचे अपहरण झाल्याने आडगाव पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद झाला. तत्कालीन अधिकाऱ्यांना पुरावे न मिळाल्याने रखडलेल्या तपासाचा निपटारा करण्याची सूचना गुन्हे सहायक आयुक्त संदीप मिटके यांनी केला. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास करून संशयिताची ओळख पटवली. त्यानुसार संशयिताने पीडितेला नागपुरात नेले. तिथे खासगी शाळेत शिक्षक असणाऱ्या संशयिताने मुलीलाही तिथेच प्रवेश घेऊन दिला होता.
सूत्रांच्या माहितीनुसार, अपहरणकर्ता आणि अपहृत मुलीची पाच वर्षांपासून ओळख होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघे संगनमताने पळाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पीडितेस पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Web Title: teacher who kidnapped a minor girl is finally in the net