विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन रात्री प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या; प्राध्यापकासह चौघांना अटक
Breaking News | Pune Crime: खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन रात्री बीजगणित विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस.
पुणे – अभियांत्रिकी परीक्षेतील शैक्षणिक प्रामाणिकतेला काळिमा फासणारा प्रकार वाघोलीत उघडकीस आला आहे. एका खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकाने विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन रात्री बीजगणित विषयाच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित प्राध्यापकासह तिघा विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील पार्वतीबाई गेनबा मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रतीक सातव हे सोमवारी (ता. २) दुपारी झालेल्या अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वर्षातील बीजगणिताची (मॅथेमॅटिक्स-२) प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांकडून रात्री सोडवून घेणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहामधील सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे यांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांच्या पथकाने रात्री छापा टाकला. त्यावेळी अभियांत्रिकी शाखेच्या प्रथम वर्षातील आठ विद्यार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडवून घेण्यात येत असल्याचे आढळले. पोलिसांनी उत्तरपत्रिकांची सहा बंडले, तसेच प्रा. सातव आणि साथीदारांकडून दोन लाख सहा हजार रुपये जप्त केले. याप्रकरणी प्रा. सातव यांच्यासह चौघांवर वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे, कानिफनाथ कारखेले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बनावट चावी, लाखोंचा व्यवहार –
ज्या विद्यार्थ्यांना बीजगणित विषयात नापास होण्याची भीती होती, त्यांना आरोपींनी हेरले. प्रा. सातव आणि त्यांच्या साथीदारांनी परीक्षा कक्षाची बनावट चावी तयार केली. त्यानंतर कक्षातून सीलबंद उत्तरपत्रिकांची सहा बंडले काढली. मूळ उत्तरपत्रिका काढून रात्रीच्या वेळी आठ विद्यार्थ्यांना पुन्हा लिहिण्यासाठी दिल्या.
आरोपींनी त्याच्या मोबदल्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडून १० ते ५० हजार रुपये घेतले होते. गुन्हा दाखल झालेले तिघेजण अभियांत्रिकी शाखेत दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहेत, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिली.
प्रा. प्रतीक किसन सातव (वय ३७, रा. केसनंद, वाघोली), आदित्य यशवंत खिलारे (वय २०), अमोल अशोक नागरगोजे (वय १९), अनिकेत शिवाजी रोडे (वय २०, तिघेजण रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस अंमलदार शेखर काटे यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Breaking News: took money from students and solved question papers at night