शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी लाच, भूकर मापकासह दोघांना ताब्यात
Breaking News | Pune Bribe Crime: शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने ताब्यात.
पुणे: शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर मापकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात (Arrested) घेतले. या दोघांविरुद्ध शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूकरमापक शिवराज यशवंत बंडगर (वय २४) आणि अमोल विष्णू कदम (वय २७, रा. सरदवाडी, ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी धामारी (ता. शिरूर) गावातील त्यांच्या शेतजमिनीची मोजणी करून हद्द निश्चित करण्यासाठी शिरूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता.
त्यासाठी आवश्यक शुल्कही भरले होते. परंतु भूकरमापक शिवराज बंडगर आणि खासगी व्यक्ती अमोल कदम यांनी तक्रारदाराकडे शेतजमीन मोजणीसाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावर तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले.
दरम्यान, तक्राररदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी बुधवारी धामारी गावात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. याबाबत शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Two detained along with land tax surveyor for bribe to count agricultural land
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study