गुलाबराव पाटलांच्या चालकाने हॉर्न वाजवल्यानं राडा, नववर्षाच्या रात्री दोन गट भिडले
Breaking News | Jalgaon Crime: मंत्री गुलाबराव पाटलांच्या परिवाराला घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या आणि कारचा कट लागल्याच्या कारणातून हा वाद झाल्याची माहिती.
जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात काल 31 डिसेंबरच्या रात्री दगडफेक आणि जाळपोळची घटना घडली. मंत्री गुलाबराव पाटलांच्या परिवाराला घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या चालकाने हॉर्न वाजवल्याच्या आणि कारचा कट लागल्याच्या कारणातून हा वाद झाल्याची माहिती आहे. यानंतर पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यानंतर संतप्त जमावाने पाळधी गावात दगडफेक करत जाळपोळ केली. या घटनेत 12 ते 15 दुकाने जाळली आहेत. या घटनेने गावात तणावपुर्ण शांतता निर्माण झाली आहे.
रात्री उशिरापर्यंत दगडफेक आणि जाळपोळ करणाऱ्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. घटनास्थळावरून आरोपी पळून गेल्याने परिस्थिती नियंत्रणात असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
काल रात्री मंत्री गुलाबराव पाटील यांचं कुटुंब वाहनांमधून जात होतं, वाहन चालकाने हॉर्न वाजवला आणि त्याचा राग काही जणांना आला आणि त्यानंतर दोन गट आपापसात भिडले. त्यानंतर संपूर्ण घटना घडली आहे. वाहनांची आणि कारची तोडफोड करण्यात आलेली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस गावामध्ये दाखल झाले. त्यानंतर संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. गावात तणावपूर्ण शांतता दिसून येते आहे.
उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. जशी जशी परिस्थिती निवळेल तशी संचारबंदीचा कालावधी केला जाणार आहे. आतापर्यंत वीस ते पंचवीस अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, जाळपोळ करणारे नेमके कोण होते, त्याबाबतची अद्याप माहिती पोलिसांना पूर्णपणे मिळालेली नाही. दोन ते चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून जी माहिती मिळालेली आहे, त्यानुसार कारवाई सुरू आहे.
Web Title: two groups clashed on New Year’s Eve when Gulabrao Patil’s driver honked his horn
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News