अजित पवारांच्या भेटीला शरद पवार गटाचे दोन आमदार
Ajit Pawar: मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे अद्याप कायम.
नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या ‘विजयगड’ या शासकीय निवासस्थानी आज शरद पवार गटातील आमदार व प्रतोद रोहित आबा पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलिल देशमुख पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. दोन दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनीदेखील अजित पवारांची भेट घेतली होती.
दिल्लीत शरद पवार यांच्या बाढदिवसानिमित्त दोन्ही गटांच्या नेत्यांच्या स्नेहमीलनानंतर आता राज्यात हे दोन्ही गट एकत्र येणार का, याविषयीची उत्सुकता आहे. नागपूरला सुरू असलेल्या राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचे शनिवारी सूप वाजणार आहे. भाजपचे एक मंत्रिपद राखीव आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे अद्याप कायम आहे. अशातच काही दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांच्या बंगल्यावर भेटीगाठींना जोर आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचीदेखील हातात डाळिंब घेत नुकतीच भेट झाली. इकडे जयंत पाटील यांच्यासाठीच एक मंत्रिपद राखीव असल्याची चर्चा आणि आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलेली भावना हा सर्व एकंदरीत घटनाक्रम बघितला जाता अजित पवार गटात इनकमिंग होणार का, छगन भुजबळ खरेच अजित पवारांना सोडून भाजपमध्ये जाणार का, असा प्रश्न जोरात चर्चेत आहे.
दरम्यान, सत्तारूढ नेत्यांना आपल्या मतदारसंघातील कामांसाठी भेटावेच लागते, अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली, तर आमदार रोहित पाटील यांनी आपण आपल्या मतदारसंघातील ऊर्जा विभागाशी डीपीसंबंधित कामासाठी गेलो होतो. यात वेगळे काही नाही, असे सांगितले, सलिल देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर आज त्यांनी घेतलेली अजित पवारांची भेट कशासाठी घेतली हे आता लवकरच कळणार आहे.
Web Title: Two MLAs of Sharad Pawar group met Ajit Pawar
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study