अहिल्यानगर: गावठी कट्टा विक्री करताना दोन तरुणांना अटक
Breaking News | Ahilyanagar Crime: गावठी कट्टा विक्री करताना दोन तरुणांना अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाने अटक.

श्रीरामपूर : शहरातील मोरगे वस्ती परिसरामध्ये गावठी कट्टा विक्री करताना दोन तरुणांना अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडे गावठी कट्टा व एक काडतूस आढळले. शनिवारी ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव साहिल शकील पिंजारी (वय २३, रा. मोरगेवस्ती) असे आहे. दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी साहिल पिंजारी विरूद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील आरोपीने पिस्तूल कोठून आणले तसेच त्याच्या विक्रीचा उद्देश काय होता, याची माहिती पोलिस घेत आहेत. शहरातील नॉर्दन ब्रांच चौक ते डावखर चौक परिसरामध्ये गावठी कट्ट्याच्या विक्रीची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने येथे सापळा रचला होता. कारवाईमध्ये पोलिस अंमलदार दादासाहेब लोंढे, संदीप दरंदले, राजेंद्र बिरवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाढे सहभागी झाले होते. शस्त्र सुधारणा अधिनियम २०१९नुसार अल्पवयीन बालकास अग्निशस्त्र विकणे, त्याच्या ताब्यात देणे या बाबीसाठी गंभीर शिक्षेची तरतूद आहे. त्यात जन्मठेपपर्यंत शिक्षा होऊ शकते.
Breaking News: Two youths arrested while selling village katta

















































