पुणे | Weather Rain Alert: राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. ढग जमा होत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका आणि उकाडाही कायम आहे. आज (ता. १५) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची (Rain) शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कमाल तापमान ४१ अंशांच्या पुढे असल्याने विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागात उन्हाच्या झळा (Heat Weave) चांगल्याच वाढल्या आहेत.
चंद्रपूर येथे गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नगर, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, वर्धा येथे ४२ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे.
गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.९, नगर ४२.६, धुळे ४२.०, जळगाव ४२.२, कोल्हापूर ३७.१, महाबळेश्वर ३१.७, नाशिक ३९.२, निफाड ३९.४, सांगली ३८.१, सातारा ३८.९, सोलापूर ४१.०, सांताक्रूझ ३५.६, डहाणू ३४.६, रत्नागिरी ३३.१, औरंगाबाद ४०.२, परभणी ४०.५, अकोला ४२.३, अमरावती ४२.८, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४२.२, चंद्रपूर ४३.२, गोंदिया ४१.५, नागपूर ४१.६, वर्धा ४२.८, वाशीम ४१.०, यवतमाळ ४१.५.
पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, उत्तर कर्नाटकपर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडित झाल्याने हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, या भागात ढगांची दाटी झाली आहे. केरळ, कर्नाटक किनारपट्टी, लक्षद्वीप बेटांसह परिसरावर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Web Title: Weather Rain Alert rain in the state