Home महाराष्ट्र भुजबळ यांचे भाजपमध्ये स्वागत करणार का? सीएम देवेंद्रजी म्हणाले….

भुजबळ यांचे भाजपमध्ये स्वागत करणार का? सीएम देवेंद्रजी म्हणाले….

Chhagan Bhujbal Devendra Fadnvis: भुजबळांना डावलण्याचा अजित पवारांचा हेतू नव्हता.

Will Bhujbal be welcomed in BJP? CM Devendraji said

मुंबई: मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ नाराज झाले आहेत. भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबद्दल आणि मंत्रिमंडळात न घेण्याबद्दलच्या कारणाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. त्याचबरोबर भुजबळांना डावलण्याचा अजित पवारांचा हेतू नव्हता, असेही फडणवीस यांनी सांगितले. ‘छगन भुजबळ तुम्हाला भेटले. ते नाराज आहेत आणि भाजपमध्ये येणार अशी चर्चा आहे’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आले.

छगन भुजबळ यांच्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय बोलले? या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ते मला भेटले आणि भेटल्यानंतर आमची काय चर्चा झाली, याबद्दल भुजबळांनी तुम्हाला (माध्यमांना) माहिती दिली आहे. वेगळ्याने माहिती देण्याची आवश्यकता नाही.” “भुजबळ साहेब आमच्या महायुतीचे प्रमुख नेते आहेत आणि तिन्ही पक्ष, मग ते अर्थातच राष्ट्रवादीचे आहेत म्हणून तिथे त्यांचा सन्मान आहे. पण, आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयात त्यांचादेखील वाटा राहिला आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भुजबळांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात का घेतलं नाही? याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मी स्वतः, अजितदादा देखील त्यांची चिंता करतात. मूळातच भुजबळ साहेबांना अजित पवारांनी मंत्रिमंडळात घेतलं. यावेळी भुजबळ साहेबांना डावलण्याचा त्यांचा (अजित पवार) हेतू नव्हता. अजित पवारांनी मला सांगितलं, आमची इच्छा आहे की, आमचा पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस) हा राष्ट्रीय पक्ष राहिलेला आहे. आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळसाहेबांसारखा नेता, ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे. त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचे आहे.” याच मुद्द्यावर पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, “भुजबळसाहेबांचे मत जरा वेगळे होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण, आम्ही सगळे मिळून यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजेत, यादृष्टीने त्यातून मार्ग काढला जाईल.”

भुजबळांचे भाजपमध्ये स्वागत करणार का?  या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, “असं आहे की, त्यांनी अशी मागणी केली नाही. अशा प्रकारचा कुठला विषयही समोर आलेला नाही. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही आणि शिवसेना तिघे एकत्र आहोत ना. त्यामुळे अशा प्रकारच्या काही भावनाच नाहीत. आम्ही एकत्रित आहोत. निर्णय एकत्रित करायचे आहेत आणि त्यांच्याबद्दल तिन्ही पक्षामध्ये आदर आहे”, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Web Title: Will Bhujbal be welcomed in BJP? CM Devendraji said

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here