Home संगमनेर संगमनेरात सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल, “दिवाळी गोड तुमची की शेतकऱ्यांची?”

संगमनेरात सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल, “दिवाळी गोड तुमची की शेतकऱ्यांची?”

Breaking News | Supriya sule in Sangamner:  नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “सरकार म्हणते दिवाळी गोड करू, पण गोड कोणाची झाली? तुमची की शेतकऱ्यांची?” असा थेट सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष वेधले.

Supriya Sule questions the government at Sangamner

संगमनेर:  येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “सरकार म्हणते दिवाळी गोड करू, पण गोड कोणाची झाली? तुमची की शेतकऱ्यांची?” असा थेट सवाल करत त्यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीकडे लक्ष वेधले.

खा. सुळे म्हणाल्या, “शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे तब्बल ८० हजार कोटी रुपये आहेत, पण शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी दहा-वीस हजार कोटी रुपये नाहीत. आता तर सरकार म्हणते, आम्ही कर्जमाफीबद्दल कधीच बोललो नव्हतो. सध्याच्या सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी पैसा नाही, काही महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे उरणार नाहीत.”

त्या सावरगाव घुले (ता. संगमनेर) येथे माजी पोलिस पाटील लाडूजी घुले यांच्या अभिष्टचिंतन व शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या. या वेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात, गणपत महाले, संदीप वर्षे, सुहास वाळुंज, जालिंदर गागरे, गौरव डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मालाला बाजारभाव नाही, शेतकऱ्यांच्या घरात अंधार

खा. सुळे म्हणाल्या, “कांदा, झेंडू, केळी यांना आज बाजारभाव नाही. शेतकऱ्यांच्या घरात अंधार आहे, तर सरकारच्या घरात मिठाईचे बॉक्स पोहोचले आहेत. सरकार एसीत बसते, गाडीतून फिरते आणि आम्ही शेतकरी आत्महत्या करत आहोत. आमची तिरडी गेल्यावर मग कर्जमाफी करणार का?”

त्या पुढे म्हणाल्या, “जनजीवन मिशन योजनेची अवस्था बिकट आहे. किती टाक्या बांधल्या आणि किती पूर्ण झाल्या याचा पत्ता नाही. काही ठेकेदारांची बिले निघाली, काहींची नाही. हे सरकार केवळ दिखावा करत आहे. शेतकरी, शिक्षक, ठेकेदार आत्महत्या करत असताना सरकार मात्र उत्सव साजरे करत आहे. जनतेचे दुःख पाहण्याची तयारी सरकारकडे नाही.”

खा. सुळे यांनी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गौरव करत म्हटले, “येथील शेतकरी आजही पांढरी टोपी, पायजमा आणि कडक टोपी घालतो. हे या भूमीचे अभिमान आहे. आमच्याविरोधात सत्ताधारी, यंत्रणा आणि नेते होते, तरी जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला.”

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही – बाळासाहेब थोरात

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “सह्याद्रीच्या रगातील पठार भाग नेहमीच पाण्याअभावी संकटात असतो. येथील लोक मेहनती आणि प्रामाणिक आहेत. लाडूजी घुले यांनी गावासाठी उत्कृष्ट काम केले आहे. आज शेतकरी बिकट परिस्थितीत आहे. मविआ सरकारने पहिल्याच बैठकीत कर्जमाफी केली होती, पण सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे नाही.” थोरात पुढे म्हणाले, “शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावावर राजकारण करून जातीवाद्यांना साथ देणे चुकीचे आहे.”

Breaking News: Supriya Sule questions the government at Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here