संगमनेर: शेतकरी गिनी गवत तोडायला वाकला अन बिबट्याने मारली झडप
Breaking News | Sangamner: उंबरी बाळापुरात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी.
आश्वी: जनावरांसाठी गिनी गवत तोडत असलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला. शेजारीच असलेली पत्नी व मुलगा हिंमत करून शेतकऱ्याच्या दिशेने धावले. त्यांनी आरडाओरडा करत बिबट्याला पिटाळले. ही घटना उंबरी बाळापूर शिवारातील कारवाडी येथे मंगळवारी (दि. १७) सकाळी घडली. जखमी शेतकऱ्यास घुलेवाडी येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
कारवाडी येथील मच्छिंद्र दगडू कालेकर (वय ५६) हे सकाळी ८:३० च्या सुमारास नेहमीप्रमाणे जनावरांसाठी गिनी गवत आणण्यासाठी शेतात गेले. यावेळी त्यांच्या समवेत पत्नी आणि मुलगा जीवन कालेकरदेखील होते. पत्नी व मुलगा शेतातील इतर काम करत होते, तर ते स्वतः खाली वाकून गिनी गवत तोडत होते.
शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याला खाली वाकलेले मच्छिंद्र कालेकर हे सावज वाटल्याने त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. पत्नी व मुलाने प्रसंगावधान राखत जोरदार आरडाओरडा करत धाव घेतल्यामुळे बिबट्याने तेथून धूम ठोकली. माहिती मिळताच संदीप होडगर, किरण कालेकर, सचिन चंद, समाधान होडगर, जीवन कालेकर, नितीन होडगर आदींनी तत्काळ जखमी कालेकर यांना घुलेवाडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
Breaking News: farmer bent down to cut the guinea grass and was attacked by a leopard