Home अकोले भंडारदरात धो धो पाऊस, पाण्याची विक्रमी आवक, सतर्कतेचा इशारा

भंडारदरात धो धो पाऊस, पाण्याची विक्रमी आवक, सतर्कतेचा इशारा

Breaking News | Rain Update:  आज विक्रमी पाण्याची आवक होणार, भंडारदरा धरणाचा पाणीसाठा रविवारी (दि.7) सायंकाळी 6 वाजता 7914 दलघफू (71.69 टक्के) तर निळवंडेचा 6169 दलघफू (74.32 टक्के) झाला.

Heavy rain in Bhandara, record inflow of water, alert issued

भंडारदरा: सह्याद्री घाटमाथ्यावर आषाढ सरींचे तांडव सुरूच असल्याने धरणांत नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भंडारदरा धरणाचा पाणीसाठा रविवारी (दि.7) सायंकाळी 6 वाजता 7914 दलघफू (71.69 टक्के) तर निळवंडेचा 6169 दलघफू (74.32 टक्के) झाला आहे. मात्र, पावसाचा जोर कायम असल्याने जलसंपदा विभागाने जलाशय परिचलन सूचीनुसार 8331 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात विसर्ग सोडल्याने निळवंडे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. या धरणातून काल रविवारी राञी 11 वाजता 800 क्युसेस पर्यंत विसर्ग वाढविला होता.

पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास निळवंडेतून प्रवरा नदीत कोणत्याही क्षणी विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर वाढल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक वाढल्याने दोन्हीही धरणातून विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची शक्यता आहे. सततच्या पावसामुळे पाणलोटातील जनजीवन विस्कळीत झाले असून परिसर गारठून गेला आहे.

विसर्ग (क्युसेकमध्ये)

भंडारदरा 8331, निळवंडे 800, मुळा 13375, गोदावरी 39172, आढळा 277

24 तासांत पडलेला पाऊस (आकडे मिमीमध्ये)

भंडारदरा 72, घाटघर 92, रतनवाडी 98, निळवंडे 28, पांजरे 73, वाकी 58, आढळा 05, अकोले 18

पाणी वाढल्याने गोदावरी नदीकाठी सतर्कतेचा इशारा

राहाता:  नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाची संततधार सलग दुसर्‍या दिवशी सुरू असल्याने धरणात पाण्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे धरणांचे विसर्ग वाढल्याने नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत काल 39172 क्युसेक विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरी दुथडी वाहू लागल्याने गोदाकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दोन दिवसांपासून दारणा धरणाच्या पाणलोटात घोटी, इगतपुरी परिसरात संततधार सुरू आहे, त्यामुळे धरणात पाण्याची चांगली आवक होत आहे. काल सकाळी सहा वाजेपर्यंत मागील 24 तासांत दारणा धरणात 825 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. दारणा समूहातील भावलीतून 1218 क्यूसेक, भाम मधून 5283 क्यूसेक, वाकीतून 1041 क्यूसेकने विसर्ग दारणा धरणाच्या दिशेने सुरू आहे. तसेच घोटी, इगतपुरीच्या घाटमाथ्यावरील पाणी नव्याने दाखल होत असल्याने दारणा धरणातून करण्यात येणार्‍या विसर्गात वाढ होत आहे.

काल सकाळी सहा वाजता 7914 क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग काल सायंकाळपर्यंत 9932 क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला. दारणा नदीतून हे पाणी नांदूर मधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने वेगाने झेपावत आहे. काल सकाळपर्यंत या धरणातून 5.4 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मार्गात वालदेवी 65 क्यूसेक, आळंदीतून 243 क्यूसेक, मुकणेतून 400 क्यूसेक वेगाने विसर्ग सामावत आहे.

काल सकाळी सहा वाजेपर्यंत मागील 24 तासांत दारणा धरणाच्या पाणलोटात इगतपुरी 90, घोटी येथे 61, भावलीला 129, भाम 90, वाकी 61 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर धरणाच्या पाणलोटात आंबोली येथे 166, त्र्यंबक येथे 70, कश्यपीला 80, गौतमीला 77 मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूर समूहातील कश्यपी धरणातून 500 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणात 24 तासांत अर्धा टीएमसी पाण्याची आवक झाली. गंगापूर धरणातून काल सायंकाळी 5186 क्यूसेकने विसर्ग गोदावरीत सुरू होता. काल सकाळी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून 3.6 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रविवारी सकाळी सहा ते सायंकाळी 6 या 12 तासांत गंगापूरच्या पाणलोटातील आंबोली येथे 157 मिमी पावसाची नोंद झाली.

त्र्यंबकला 89, गंगापूरला 23, गौतमीला 60, कश्यपीला 22 मिमी पावसाची नोंद झाली. 12 तासांत गंगापूर धरणात 270 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. गंगापूरमध्ये 60.42 टक्के पाणी साठा आहे. पालखेड धरणातूनही 646 क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. वरील सर्व धरणांचे पाणी खाली नंदुरमधमेश्वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने नंदुरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेने 39172 क्यूसेकने विसर्ग झेपावत आहे. या विसर्गामुळे गोदावरीचे पात्र तुडूंब भरून वाहत आहे. काल सकाळी सहा वाजेपर्यंत एकूण 18 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. जायकवाडीत उपयुक्त साठा 50 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.

Breaking News: Heavy rain in Bhandara, record inflow of water, alert issued

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here