“…तर निवडणुकीतील घोटाळे उघड होतील”; बाळासाहेब थोरातांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
Breaking News | Sangamner | Election Commission: माझ्या पराभवाने सर्वांनाच धक्का बसला आहे. खोटे मतदान नोंदवले गेल्याचा आक्षेप मी घेतला होता, पण त्याचा तपासच झाला नाही, असेही थोरात म्हणाले.
नाशिक: निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर जोरदार टीका करत लोकसभा निवडणुकीत मतचोरी आणि मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले आहेत. असा दावा करत, जर निवडणूक आयोगाने डिजिटल स्वरूपात माहिती दिली, तर सर्व घोटाळे समोर येतील, असा गंभीर आरोप माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत सादर केलेल्या मतचोरीच्या पुराव्यांचा उल्लेख करत ते म्हणाले की, “निवडणुका चुकीच्या पद्धतीने आणि घोटाळे करून जिंकल्या जात आहेत. भाजप लोकशाही संपवण्याचे काम करत आहे. जनतेने आता जागृत होण्याची गरज आहे. अलीकडच्या निवडणुकांवर (Election) संशय व्यक्त करत, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोग देऊ शकत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. स्वत:च्या पराभवाबाबतही थोरात यांनी आश्चर्य व्यक्त केले. माझ्या पराभवाने सर्वांनाच धक्का बसला आहे. खोटे मतदान नोंदवले गेल्याचा आक्षेप मी घेतला होता, पण त्याचा तपासच झाला नाही, असेही थोरात म्हणाले.
तसेच निवडणूक आयोगाने ४५ दिवसांत सर्व पुरावे नष्ट करण्याचा निर्णय कसा घेतला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान थोरात यांच्या या आरोपांमुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी जनतेला लोकशाही रक्षणासाठी जागृत होण्याचे आवाहनही केले आहे.
Breaking News: Balasaheb Thorat allegation on Election Commission