Ahilyanagar: भरदिवसा तरूणावर गोळ्या झाडल्या, थरार, गुन्हा दाखल
Breaking News | Ahilyanagar: शिवाजी रोडवरील थरार, गुन्हा दाखल, हल्लेखोराचा कसून तपास सुरू.
श्रीरामपूर: शहरात पुन्हा टोळी युध्दाचा भडका उडाल्याचे पहायला मिळाले. एका तरुणाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर फायर करण्यात आल्याची घटना काल दुपारी घडली. शहरातील गिरमे चौक परिसरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएमजवळ सदर घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संघर्ष बाळासाहेब दिघे (वय ३३, रा. भैरवनाथनगर, होलेवस्ती) याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, काल दुपारी माझ्यासोबत सागर बेग, आकाश बेग, रोहीत यादव व राष्ट्रीय श्रीराम संघाचे इतर कार्यकर्ते मशिदीवरील भोंग्या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन शिवाजी रोडवरील गिरमे चौकातील ग्रॅज्यूएट चहाच्या समोरील चायवाला येथे चहा घेण्यासाठी थांबलो. त्यावेळी माझा मित्र सोनू राठोड हा ग्रॅज्युएट चहाच्या दुकानासमोर आला, त्याने मला त्याच्याजवळ बोलविले, मी सोनू राठोड याच्याजवळ जाऊन बोलत असताना त्याठिकाणी माझ्या ओळखीचा हुजेफा अनीस शेख (रा. वॉर्ड नं. २) आला. त्याने माने माझ्याकडे पाहुन विनाकारण कमरेला खोसलेला पिस्टल काढुन लोड करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मी घाबरुन त्याला धक्का देऊन खाली पाडण्याचा प्रयत्न केला. परंतू, तो खाली न पडता एचडीएफसी बँकेच्या एटीएमजवळील बोळीतून पळाला. हा सर्व गोंधळ माझ्याबरोबर असलेल्या मित्रांनी पाहिल्याने ते देखील माझ्यामागे पळाले. माझ्याबरोबर तुषार कुहे व इतर काही मित्र हुजेफा शेख याच्या मागे त्याला पकडण्यासाठी पळालो, त्याने पुढे पळत असताना पाठीमागे पाहुन माझ्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील पिस्तूलमधून दोन गोळ्या फायर केल्या. परंतू आम्ही गल्लीतील भिंतीचा आडोशा घेतला. त्यानंतर पुन्हा त्याच्या मागे पळालो असता, तो सैलानी बाबा दर्गाकडून पसार झाला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९ सह आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना घडल्यानंतर या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अप्पर पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक नितीन देशमुख आदींनी घटनास्थळी येऊन पहाणी केली. नंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दिवसभर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पहात होते.
गँगवॉर थांबवा, आ. ओगलेंनी पोलीस अधिकाऱ्यांना सुनावले
सदर घटनेच्या वेळी आ. हेमंत ओगले हे ससाणे यांच्या घराच्या खाली असलेल्या कार्यालयात बसलेले होते. पळत असलेल्या तरुणाकडे पिस्टल असल्याचे आ. ओगले यांनी पाहिले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, पो. नि. नितीन देशमुख हे पाहणी करण्यासाठी आले असता, आ. ओगले यांनी भरदिवसा श्रीरामपुरात गँगवॉर होत असेल तर, सामान्य नागरिकांना येथे राहणे मुश्किल होणार आहे. येथील गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही, हे थांबले पाहिजे, श्रीरामपूर गँगवॉर मुक्त झाले पाहीजे, यापुढील काळात पोलीस प्रशासनाचा या टोळक्यांवर धाक निर्माण झाला नाही, तर सामुहिकरित्या याप्रकरणी आवाज उठविला जाईल, असा इशारा आ. ओगले यांनी दिला.
Breaking News: Youth shot in broad daylight, shock, case registered