अकोले: आंदोलकांची कोंडी करण्यासाठी अन्नपाण्याला शस्त्र बनविणे अमानवीय
Breaking News | Maratha Reservation: मराठा आंदोलकांना जेवण व पाणी मिळू नये यासाठी हॉटेल्स बंद करण्यात आल्याच्या बातम्या आहेत. पिण्याचे पाणी सुद्धा त्यांना मिळू नये यासाठी डावपेच केले जात आहेत.
अकोले: मराठा आंदोलकांना जेवण व पाणी मिळू नये यासाठी हॉटेल्स बंद करण्यात आल्याच्या बातम्या आहेत. पिण्याचे पाणी सुद्धा त्यांना मिळू नये यासाठी डावपेच केले जात आहेत. लोकशाहीमध्ये सर्वांना आंदोलन करण्याचा व मते मांडण्याचा अधिकार आहे असे एकीकडे म्हणायचे व दुसरीकडे अन्न आणि पाण्यापासून आंदोलकांची कोंडी करायची. सत्ताधार्यांची ही कृती लोकशाही विरोधी तर आहेच शिवाय ती अमानवीय कृती असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. अजित नवले यांनी केली आहे.
याबाबत बोलताना डॉ. नवले पुढे म्हणाले, मागण्यांबद्दल वेगवेगळी मते असू शकतात, मात्र मानवतेबद्दल वेगळे मत असू शकत नाही. आंदोलनासाठी गावगाड्यातून आलेल्या शेतकरी पोरांना जेवायला मिळू नये, पिण्याला पाणी सुद्धा मिळू नये, अशाप्रकारे जर कोणी प्रयत्न करत असतील तर ते संपूर्णपणे चुकीचे आहे. मानवतेचे दर्शन घडवित, किसान सभेच्या लॉन्ग मार्चच्या वेळी शेतकर्यांचे ज्या उदात्तपणे शहरवासियांनी स्वागत केले व प्रसंगी घासातला घास देऊ केला त्याचप्रकारे महाराष्ट्रभरातील लाखो शेतकर्यांची पोरं या मोर्चासाठी शहरात आली आहेत.
शहरवासियांनी त्यांनाही घासातला घास देत अन्न, पाणी व निवासाची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करावे व मानवतेचे दर्शन घडवावे. तसेच राज्य सरकारने अन्न व पाण्याला शस्त्र न बनविता आंदोलकांशी चर्चा करावी व योग्य तोडगा काढावा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने प्रदेश सचिव डॉ. अजित नवले यांनी केले आहे.
Breaking News: Maratha Reservation inhumane to weaponize food and water to harass protesters