डोळ्यादेखत चिमुकल्याला बिबट्याने नेले फरफटत; आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
Breaking News | Ahilyanagar: आईसमोरचं बिबट्याने मुलाला फरफटत जंगलाच्या दिशेने नेले. यावेळी आईने काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश.
अहिल्यानगर : मजुरीच्या कामानिमित्ताने आलेला परिवार पत्राचे शेड टाकून वास्तव्यास राहतो. रात्रीच्या सुमारास मुलाला लघुशंकेसाठी बाहेर आणताच तीन वर्षीय चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेले. आईसमोरचं बिबट्याने मुलाला फरफटत जंगलाच्या दिशेने नेले. यावेळी आईने काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. दुसऱ्या दिवशी सिद्धेश्वरवाडीच्या जंगलात अमनचा केवळ डोक्याचा भाग आढळून आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेरच्या सिद्धेश्वरवाडी परिसरात सदरची घटना घडली आहे. सिद्धेश्वर वाडी परिसरात बिबट्याने तीन वर्षीय अमन खुंटे या चिमरूड्याला आई समोरचं उचलून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगड येथून मजुरीसाठी आलेले परप्रांतीय खुंटे कुटुंब सिद्धेश्वर वाडी परिसरात पत्र्याच्या शेड टाकून राहत होते. मोलमजुरी करून आपला चरितार्थ चालवत होते.
दरम्यान सोमवारी रात्री अमन याला लघुशंकेसाठी त्याच्या आईने त्याला घराबाहेर आणले. यावेळी जवळच अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अमनवर झेप घेत त्याला आईसमोर जंगलात उचलून नेले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अमनची आई भेदरली. तिने आरडाओरडा केला असता परिसरातील लोक जमा झाले. यानंतर घटनेबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली. दरम्यान रात्रभर शोध कार्य करून देखील अमन सापडला नाही.
यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी पुन्हा सकाळी शोध मोहीम राबविली. यानंतर सिद्धेश्वर वाडीच्या जंगलात अमनचा केवळ डोक्याचा भाग आढळून आला आहे. आजूबाजूला शोध घेतला, मात्र त्याचे धड आढळून आले नाही. याबाबत पोलिसांनी अकस्मात नोंद केली आहे. तर बिबट्याला कैद करण्यासाठी वन विभागाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
Breaking News: A leopard snatched a small child before our eyes