अहिल्यानगर: व्यापाऱ्याने फसवले; शेतकऱ्याने जीवन संपविले
Breaking News | Ahilyanagar: पैशांची मागणी केली असता व्यापाऱ्याने दमदाटी केली. यामुळे शेतकरी निराश झाला. व्यापाऱ्याच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना.
अहिल्यानगर : अहोरात्र मेहनत करून पिकविलेला डाळिंबाचा बाग शेतकऱ्याने व्यापाऱ्याला विकला. हा व्यवहार साडेदहा लाखांत ठरला होता; परंतु व्यापाऱ्याने पूर्ण पैसे दिले नाहीत. साडेतीन लाखांतच शेतकऱ्याची बोळवण केली. उर्वरित पैशांची मागणी केली असता व्यापाऱ्याने दमदाटी केली. यामुळे शेतकरी निराश झाला. व्यापाऱ्याच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
किरण पोपट ठोंबरे (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना २१ मे रोजी सायंकाळी तांदळीवडगाव शिवारात (ता. अहिल्यानगर) घडली. याप्रकरणी
व्यापाऱ्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात बुधवारी दाखल झाला. नितीन बबन शिंदे (रा. देशमुखवाडी, ता. कर्जत) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत मयताचे वडील पोपट दशरथ ठोंबरे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मयत मुलाने डाळिंबाची बाग लावली. मेहनत करून बाग फुलविली. डाळिंबाला चांगले फळ आले. हा बाग मयताने २०२३- २०२४ मध्ये कर्जत येथील व्यापाऱ्याला विकला. १० लाख ५० हजारांत हा व्यवहार ठरला होता. यातील ३ लाख ४९ हजार रुपये व्यापाऱ्याने मयताच्या आईच्या बँक खात्यात जमा केले. सात लाख रुपये व्यापाऱ्याकडे राहिले होते. या पैशांसाठी मयत व्यापाऱ्याकडे पाठपुरवा करत होते; परंतु व्यापाऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. मयताने पैशांची मागणी केल्याने व्यापाऱ्याने शिवीगाळ करीत दमदाटी केली. शेतात फुलविलेल्या बागेचे पैसे न मिळाल्याने मयत हातबल झाले. त्यांनी नैराश्येतून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. व्यापाऱ्याच्या जाचाला कंटाळून मुलाने आत्महत्या केली, असे वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे.
Breaking News: businessman cheated the farmer ended his life