अकोलेत शेतमजूर युवकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू
Breaking News | Akole: मोलमजुरी करणार्या एका बावीस वर्षीय आदिवासी शेतमजूर युवकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना.
अकोले: मोलमजुरी करणार्या एका बावीस वर्षीय आदिवासी शेतमजूर युवकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास बेलापूर गावातील मल्हारवाडी परिसरात घडली आहे. पप्पू बाळू दुधवडे (वय 22, रा. ब्राह्मणदरा, म्हसवंडी, ता. संगमनेर) असे या घटनेत ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने पिंजरे लावले आहेत.
शनिवारी सकाळी सात वाजता मोलमजुरी करण्यासाठी तो बेलापूर गावी गेला होता. परंतु रात्री घरी परतत असताना मोटरसायकलचे पेट्रोल संपल्याने ओळखीच्या घराजवळ त्याने गाडी थांबवली व तो आपल्या घराकडे पायी निघाला होता. यावेळी बिबट्याने त्याच्यावर प्राणघातक हल्ला करून त्यास ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास रविंद्र दुधवडे हा तरुण बेलापूर बदगी येथे कामासाठी जात असताना मल्हारवाडी येथील भिसे वस्तीजवळ डांबरी रस्त्याच्या कडेला बिबट्याने खाल्लेला मृतदेह त्याला आढळून आला.
रविवारी सकाळी आदिवासी तरुण रवींद्र दुधवडे हा तरुण पायी बेलापूर येथे मजुरीला जात असताना त्याला बेलापूर गावांतर्गत मल्हारवाडी येथील पिसेवस्तीवरील डांबरी रस्त्याच्या कडेला बिबट्याने खालेल्या अवस्थेत मृतदेह निदर्शनास आले.रवींद्र दुधवडे याने पोलीस पाटील केशव त्रिभुवन, भगवान दादा काळे यांना सदर घटनेची माहिती दिली. त्यांनी अकोले पोलीस स्टेशन व वन विभागाचे अधिकारी यांना या घटनेची माहिती दिली. सदर घटनेची माहिती कळताच वन परिक्षेत्र अधिकारी के.सी.पाटील,वन रक्षक दीपक शिंदे,आर एस आंबरे,सुनील शिर्के,नितीन वारे, एस के बढे,बहीरु बेनके,दीपक गवारी, सुनील कुक्कुटवार यांनी पंचनामा केला व नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यासाठी ठीक ठीकाणी पिंजरे लावले तर या वेळी पोलीस उप निरीक्षक बी.टी.घोडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूराव देशमुख, जे जे ठेकेदार यांनी सदर घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.व खाजगी रुग्ण वाहिकेतून सदर मृतदेह शव विच्छेदन करण्यासाठी कोतुळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला.
Breaking News: Young agricultural labourer dies in leopard attack in Akole